- 40-45 किलो आयईडीचा साठा असलेली कार पकडली
- हिज्बुल मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी होता कारचा चालक
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला. तब्बल 40 ते 45 किलो “आयईडी’घेऊन जात असलेली एक कार पकडण्यात सुरक्षा दलांना यश आले. या कारचा वापर आत्मघातकी हल्ल्यासाठी केला जाणार असावा, असा अंदाज आहे. पुलवामामध्ये 2019 साली सीआरपीएफच्या वाहनाच्या ताफ्यावर अशाच प्रकारे स्फोटकांनी भरलेली कार घुसवून आत्मघातकी स्फोट घडवून आणला गेला होता. त्या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते. आज स्फोटकांनी भरलेली कार पकडल्यानंतर त्या भीषण हल्ल्याप्रमाणेच हल्ला करण्याची दहशतवाद्यांची तयारी होती, हे स्पष्ट झाले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई सॅन्ट्रो कार हेरली आणि त्या कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहनचालकाने कारचा वेग कमी न करता आणखीनच वाढवला आणि सुरक्षा रक्षकांनी उभ्या केलेल्या बॅरिकेडना टाळून निघून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी कारच्या दिशेने गोळीबार केल्यावर चालक कार सोडून पळून गेला. त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याचे आढळून आले, असे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारपासून अशा कारचा शोध घेतला जात होता. असे त्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांचा उद्देश सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ल्या करण्याचा होता. त्यासाठीच 40-45 किलो आयईडी या कारमध्ये भरलेली होती. या स्फोटकांच्या तपासणीसाठी बाहेरून तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. या कारचा चालक हिज्बुल मुजाहिदीनचा संशयित दहशतवादी होता. तो गेल्या वर्षी झालेल्या भीषण हल्ल्यामागील सूत्रधार असलेल्या जैश-ए-मोहंम्मदच्याही संपर्कात होता, असेही कुमार यांनी सांगितले.
जम्मू काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांनी केलेली ही संयुक्त कारवाई होती. गेल्यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या अशाच दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश-ए-मोहंम्मदचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. पाकिस्तान आणि भारताच्या लढाऊ विमानांमध्ये हवाई चकमकही झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांना चिथावणी दिली जात होती. या काळात 30 सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांना वीरमरण आले आहे. हिज्बुल मुजाहिदीनचा आघाडीचा कमांडर हा पुलवामामध्येच झालेल्या चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर घुसखोरीच्या अनेक प्रयत्नांना सुरक्षा दलांनी हाणून पाडले होते.
कार नष्ट केली…
पकडलेली कार आणि स्फोटके दोन्ही नंतर बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून नष्ट करण्यात आले. यासाठी या कारवर रात्रीपासूनच लक्ष ठेवले गेले. त्यानंतर आजूबाजूची घरे रिकामी केली गेली. त्यानंतर करण्यात आलेल्या मोठ्या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. ही कार स्फोटकांसह चालवत घेऊन जाणे धोक्याचे ठरले असते, त्यामुळे ती नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले.