पॅरिस: करोनाची दुसरी लाट या वर्षाच्या अखेरीस फ्रान्समध्ये थडकण्याची शक्यता आहे. फ्रान्समध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्याच्या आधारे वरिष्ठ सरकारी संशोधन संस्थेमधील संशोधकांनी हा अंदाज वर्तवला आहे.
फ्रान्समध्ये कोविड-19 ला नियंत्रित करण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या बऱ्यापैकी आटोक्यातही आली होती. युरोपातील बहुतेक देशांमध्ये नव्याने बाधित सापडण्याचे प्रमाणही आटोक्यात आले असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
मात्र, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान व्हायला लागल्याने अनेक देशांमध्ये लॉकडाऊन शिथिल केला गेला. परिणामी पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचे दिसायला लागले आहे. आताची स्थिती खरोखर काळजी घ्यावी अशी आहे. या स्थितीतून सावरायला पुन्हा वेळ लागू शकतो.
कदाचित ही स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येऊ शकत नाही, असे फ्रेंच शास्त्रज्ञांच्या कमिटीने म्हटले आहे. या कमिटीचे निवेदन आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केले आहे.
जर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे थांबवले तर या वर्षाच्या अखेरीस शरद ऋतूत किंवा हिवाळ्यात फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोविड-19 ची लाट येऊ शकते. ही साथ या उन्हाळ्यापर्यंत पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येऊ शकणार नाही, असेही या निवेदनामध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनीतील संशोधकांनीही अशाच प्रकारे दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता.