कोविड तांत्रिक समिती सल्लागारांनी वर्तविली शक्यता
पिंपरी – डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये शहरामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याचे कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले.
डॉ. साळुंखे म्हणाले, सिरो सर्व्हेच्या माध्यमातून पुढे व्यूहरचना आखण्यास मदत होणार आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर ती पुन्हा काही दिवसांनी झपाट्याने वाढली आहे. त्याचे प्रमुख कारण निष्काळजीपणाचा होते. यापुढे हिवाळा सुरु होणार असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दुसरी लाट आली तर पालिकेची तयारी पाहिजे. पालिकेने दुसरी लाट येणार हे गृहीत धरून तयारी करावी. रुग्णालयामधील मनुष्यबळ वाढवावे, बेड, ऑक्सिजन यांची उपल्बधता करून ठेवावी.
सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेतील गर्दी पाहता दिवाळीनंतर करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होणार आहेै. गणेशोत्सोवानंतर करोनाचा पीक आला होता. तसाच पीक नवरात्रोत्सवानंतर येण्याची शक्यता होती. मात्र तेवढा प्रमाणात उत्सव साजरा न झाल्याने त्यापासून संरक्षण झाले. मात्र सध्या निष्काळजीपणाचे वातावरण आहे.
जम्बो, ऑटो क्लस्टरवर भिस्त
शहरात यापुढे करोनाची स्थिती लक्षात घेता कोविड केअर सेंटर पूर्णत- बंद केलेले नाहीत. ते तात्पुरत्या स्वरुपात बंद केले आहेत. रुग्णसंख्या वाढली तर ते पुन्हा सुरू करता येतील. तसेच शहरातील जम्बो कोविड आणि महापालिकचे ऑटो क्लस्टर रुग्णालय हे प्राधान्याने सुरू राहतील. याठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने सद्यस्थितीत साडे तीन हजार बेडची व्यवस्था करून ठेवली असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.