करोनाची दुसरी लाट ओसरतीय! एप्रिलनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी करोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशातील करोनाची दुसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे. कारण  दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या  वाढत  आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण करोनामुक्त झाले, तर ८४ हजार ३३२ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ४ हजार ००२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

मागील २४ तासांमध्ये आढळलेली करोनाबाधितांची संख्या ही मागील ७० दिवसांमधील निच्चांकी संख्या ठरली आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २,९३,५९,१५५ झाली असून, २,७९,११,३८४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आजपर्यंत देशात ३,६७,०८१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १०,८०,६९० असून, आजपर्यंत २४,९६,००,३०४ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने  एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.

दरम्यान, देशामध्ये करोना लसींचा तुटवडा जाणवत असतानाच अनेकदा लसी वाया गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या अनेक लसी न वापरताच वाया गेल्या आहेत. देशभरामध्ये वाया गेलेल्या लसींची संख्या लाखांच्या घरांमध्ये आहे. अनेकदा लसी न वापरताच फेकून देण्यात आल्यात. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ जून रोजी लसीकरणासंदर्भातील नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार एखाद्या राज्यात अधिक लस वाया गेली असेल तर पुढील दिवसांत कमी लसी देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसींच्या अपव्यय टाळण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी लस वाया गेल्या आहेत. तर झारखंडमध्ये सर्वात जास्त म्हणजे ३३.९५ टक्के लसी वाया गेल्या आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात लसींच्या वाया जाण्याचा दर हा अनुक्रमे १५.७९ आणि ७.३५ टक्के आहे. झारखंडने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.