50 वर्षीय महिलेचा मृत्यू : बाधित रुग्णांचा आकडाही चिंताजनक
पुणे – शहरात करोनाबाधित असलेल्या 50 वर्षीय महिलेचा गुरुवारी (दि.2) उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरातील करोनाचा हा दुसरा बळी असून, नागरिकांनी आता तरी जबाबदारीने आणि शहाण्यासारखे वागून घरातच बसावे. करोनाचा विषाणू हा स्वत:बरोबर पहिल्यांदा आपल्या घरातील व्यक्तींना बाधा पोहोचवत आहे. त्यामुळे नागरिक किमान आपल्या कुटुंबासाठी तरी घरात स्वतःला कॉरंटाईन करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सर्दी, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे संबंधित महिलेला बुधवारी (दि.1) ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी प्रकृती गंभीर होती. तिच्या आजाराची लक्षणे करोनासारखी दिसत असल्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्काळ तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
मात्र, गुरुवारी संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. दरम्यान, शहरात गुरुवारी (दि.2) 7 करोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार शहरासह राज्यात गुणाकार पद्धतीने संख्या वाढेल. त्यामुळे ही संख्या वाढू नये, वेळीच करोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आता नागरिकांनी घरातच स्वतःला विलगीकरण करून घ्यावे. आता भाजी, किराणा किंवा अन्य कोणत्याही कामासाठी बाहेर न पडणे हेच शहाणपणाचे राहील.
37 बाधित रुग्णांवर उपचार सुरू
सध्या नायडू रुग्णालयात 29 तर, खासगी रुग्णालयांत 8 जणांवर उपचार सुरू आहेत. 69 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे शहरात आतापर्यंत 8 जणांची प्रकृती ठीक झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले.