साताऱ्यात दुसऱ्या टप्प्यात होणार प्रभागनिहाय सर्वेक्षण

सातारा (प्रतिनिधी)- करोनाला रोखण्यासाठी सातारा पालिकेने पुन्हा एकदा प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या हद्दीत सर्वेक्षणासाठी फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी होणार आहे. पालिकेच्या 456 कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी उच्च दर्जाचे सहा स्कॅनर मागवण्यात आले आहेत. आधी तपासणी पालिका कर्मचाऱ्यांची आणि नंतर प्रभागनिहाय नागरिकांची असे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. सातारा पालिकेचे कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडीताई या सतत सर्वेक्षणाच्या निमित्ताने शहरात फिरत आहेत. युध्दपातळीवर कर्मचारी स्वतःची काळजी घेत आहेत. मात्र, संसर्गाचा धोका कायम असल्याने त्यांना जीव मुठीत ठेवून काम करावे लागत आहे. पालिकेने सुरक्षा कीट व होमिओपॅथीच्या गोळ्या देण्याव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणेला इतर काही मदत मिळत नव्हती. आता दुसऱ्या टप्प्यात थर्मल स्कॅनरने कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी जाताना व माघारी परतल्यानंतर दोन वेळा ही तपासणी होणार असून किमान आपण किती सुरक्षित आहोत हे कर्मचाऱ्यांना समजणार आहे. साधारण तीन हजार रुपये किमतीचे सहा थर्मल स्कॅनर मागवण्यात आले असून त्याची चाचणी होणार असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा एकदा प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, सोमवारपासून (दि.28) सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असल्याचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांनी सांगितले. या मोहिमेत नागरिकांसाठी विशेषतः पुणे, मुंबईकरांची थर्मल स्कॅनरने तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहे. हे काम 22 कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे सुरू आहे. या पथकात पालिकेचे कर्मचारी, परिचारिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य अधिकारी यांचा समावेश होता. या पथकांनी रोज नऊ ते दहा तास काम करून 27 हजार 500 कुटुंबाचा अहवाल तयार केला. त्या नागरिकांच्या तपासणीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.

दरम्यान, कराड व जावळी तालुक्यात करोना वाढत चालल्याने पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी नेमणूक केलेले पथक पुणे, मुंबई येथून आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणार आहेत. तसेच कुटुंबप्रमुखासह, सदस्यांचा तपशील, त्यांची वैद्यकीय माहिती, नजीकच्या काळात झालेला प्रवास, सुरू असलेले उपचार याचा तपशील इत्यादी नोंदी घेतल्या जाणार आहे. ह सर्वेक्षण दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी प्रशासनाने पालिका व खासगी शाळांच्या शिक्षकांची मदतही घेतली आहे.

————–

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.