दुसरा टप्प्यातील प्रचार थंडावला – अटीतटीच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी थंडावला. कॉंग्रेस महाआघाडी आणि शिवसेना-भाजप युतीने एकमेकांवर केलेल्या टीकेमुळे वातावरण ढवळून निघालेले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचारात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत उत्कंठावर्धक आणि अटीतटीची बनली आहे. प्रचार संपल्याने आता सर्वाचे लक्ष प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे.

राज्यात चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला सात मतदारसंघात मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा दहा मतदारसंघात गुरूवारी, 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, डॉं. प्रीतम मुंडे यांची कसोटी लागली आहे. बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांच्यात थेट लढत आहे. अकोला आणि सोलापूर मतदारसंघात तिरंगी लढत आहे. या दोनही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी प्रचारसभांमधून जोरदार भाषणबाजी करीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात मोहीम उघडली. राज यांनी नांदेड आणि सोलापूरमध्ये प्रचारसभा घेतली. दोन्ही ठिकाणी त्यांच्या सभांना उत्स्फुर्त प्रितसाद मिळाला. राज आपल्या सभांमधून भाजपचे पितळ उघडे पाडत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यातूनच भाजपने राज यांच्या सभांवर होणाऱ्या खर्चाचा मुद्दा उचलून धरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.