ग्रामपंचायत निवडणूकीमुळे लाभापासून शेतकरी वंचित
नगर -महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर केली. पाहिल्या यादीत ज्याप्रमाणे जिल्ह्यातील दोन गावे होती. त्याप्रमाणे आता दोन गावांचा समावेश करण्यात आला आहे. ती दोन्ही गावे नगर तालुक्यातील आहे. त्यात बाबुडी घुमट व विळद या गावांचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक असल्याने या दोन्ही गावातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या यादीत नगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकऱ्यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावांतील शेतकरी आणि आधी कर्जमाफी दिलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी आणि नगर तालुक्यातील जखणगाव शेतकरी वगळून ही यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत नगर तालुक्यातील बाबुडी घुमट व विळद अशी निवडणूका होणाऱ्या गावांची नावे आहेत.
कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नगर जिल्हा राज्यात अव्वल राहणार आहे. जिल्ह्यातील 2 लाख 53 हजार 455 शेतकऱ्यांची कर्जखाती कर्जमाफीसाठी सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. यातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची नावांचे आधार प्रमाणिककरण करण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात 2 हजार 235 कर्ज खात्यांचे प्रमाणिककरण झालेले आहे.
शनिवारी दुपारी उशीरा सरकारच्या पोर्टलवर कर्जमाफी असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. त्यानंतर काही गावात पोर्टलवरील याद्यांच्या प्रती काढून त्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तर काही गावात आज या याद्या प्रसिध्द होणार आहेत. जिल्हा बॅंकेची शाखा, तलाठी कार्यालय, तालुका सहनिबंधक, तहसील कार्यालया आणि आपलं सरकार केंद्रात या याद्या लावण्यात येणार आहेत. शनिवारी जिल्ह्यातील काही गावांमध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द झाली आहे. तर काही गावांमध्ये प्रसिध्द होणे बाकी आहे. आज रविवारी देखील ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.