कृष्णा कारखाना दुसरा हप्ता 400 रुपये देणार

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा; येत्या आठवड्याभरात रक्‍कम होणार जमा

कराड  –
रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने शेतकरी सभासदांच्या हिताचा विचार करून 400 रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवडाभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असून, एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीच्या दरम्यान दिली जाईल, अशी घोषणा चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केली. तांबवे (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, सांगली जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष रणजीत पाटील, सभापती सचिन हुलवान, ऍड. बी. डी. पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, निवासराव थोरात, दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, सुजीत मोरे, संजय पाटील, पांडुरंग होनमाने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, यंदा साखर धंद्याची स्थिती बिकट आहे. साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून साखर उत्पादनाच्या बाबतीत भारताने ब्राझीलवरही मात केली आहे. साखरेच्या दरावर एफआरपी अवलंबून असून शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी देणे शक्‍य व्हावे, यासाठी साखरेचा किमान दर 3300 रुपये असावा, अशी साखर कारखानदारांची मागणी आहे. सध्या सरकारने साखरेच्या किमान विक्रीचा दर स्थिर ठेवल्याने तसेच इथेनॉल निर्मितीलाही सरकार प्रोत्साहन देत असल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे. कृष्णा कारखाना व राजारामबापू कारखान्याचे नाते बंधुत्वाचे असून ते देशात अग्रेसर राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी “म्हाडा’च्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल पैलवान आनंदराव मोहिते व मोहनराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. लिंबाजीराव पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक करताना कृष्णा कारखान्याच्या गेल्या 4 वर्षाच्या दैदीप्यमान कामगिरीचा आलेख मांडला. ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी जयवंत आदर्श कृषी योजना व खोडवा व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्रदीप पाटील, पै. भगवान पाटील, विठ्ठलराव पाटील, राहुल पाटील शिवाजीराव थोरात, संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, अविनाश खरात, सुनील पाटील, भास्करराव मोरे, पै. आप्पासो कदम यांच्यासह कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.