ब्राझिल स्ट्रेनने बाधित व्यक्‍तीचा ब्रिटनमध्ये शोध सुरू

लंडन,  – करोनाच्या विषाणूच्या ब्राझिलमधील प्रकाराचा संसर्ग झालेली एक व्यक्‍ती ब्रिटनमध्ये असून सध्या आरोग्य यंत्रणा या व्यक्‍तीचा कसोशीने शोध घेत आहे. या व्यक्‍तीने स्वतःहून तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याला विषाणूच्या ब्राझिलमधील प्रकारावर सध्या विकसित करण्यात आलेली लस परिणामकारक आहे की नाही याबाबत वैद्यकीय तज्ञांना अजूनही खात्रीशीरपणे सांगता येऊ शकलेले नाही.

ब्रिटनमध्ये सध्या करोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आता उठवला जाण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. ब्राझिलच्या उत्तरेकडे मनाओस इथे सापडलेल्या करोनाच्या नवीन प्रकाराचा संसर्ग ब्रिटनमधील 6 व्यक्तींना झालेला आढळले आहे. त्यापैकी एका व्यक्‍तीची माहिती नोंदवताना संपर्काचा तपशील नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे या व्यक्‍तीपर्यंत पोहोचणे अवघड बनले आहे. या व्यक्‍तीचा शोध घेण्यासाठी सध्या ब्रिटनमध्ये देशभर व्यापक मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याला शोधण्यासाठी “12 फेब्रुवारीला ज्या व्यक्‍तींनी करोनाची चाचणी केली, त्यांनी स्वतःहून प्रशासनाशी संपर्क साधावा.’ असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

मनाओसमध्ये ब्राझिल प्रकारच्या विषाणूचा संसर्ग असलेले दोघेजण सापडल्यानंतर दक्षिण ग्लाउस्थशायरमध्ये व्यापक चाचणी मोहिम सुरू करण्यात आली आहे, असे लसीकरण मंत्री नदीम झहावी यांनी सांगितले.

ब्राझिलमध्ये सापडलेला विषाणूचा प्रकार अधिक वेगाने पसरणारा आणि ब्रिटनमधील विषाणूपेक्षा ऍन्टीबॉडीजना न जुमानणारा असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या दक्षिणेकडील केंट भागात सापडलेल्या विषाणूच्या नवीन प्रकाराबद्दलही अद्याप नागरिकांमध्ये भीती आहे. त्यातच ब्राझिलमधील विषाणू सापडल्याचे वृत्त समोर आल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण व्हायला लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.