लक्षवेधी: “राज फॅक्‍टर’चा शोध आणि बोध

विश्‍वास सरदेशमुख

“लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या दहा सभा महाराष्ट्रात घेतल्या, त्यांचा परिणाम झाल्याचे निकालात दिसत नाही. मुळात राज ठाकरे यांनी आपले उमेदवार नसताना प्रचारात भाग का घेतला, असाच प्रश्‍न विचारला गेला. राज यांच्या सभांनी तुडूंब गर्दी खेचली; पण गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होताना दिसले नाही. मोदींची लाट राज यांनी ओळखली नाही, असे म्हणायचे की या सभांमधून त्यांना काही वेगळेच साध्य करायचे होते?

संपूर्ण देशाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर सलग दुसऱ्यांदा विश्‍वास दर्शविला. यावेळची निवडणूक इतकी एकतर्फी होणार नाही, असे म्हटले जात असतानाच भाजपने पुन्हा जोरदार मुसंडी मारली. ती अनेकांना अनपेक्षित होती आणि अनेकजण अजूनही धक्‍क्‍यात किंवा बुचकळ्यातही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अशाच विचारांत असावेत का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्रात रान उठवले होते. मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नसताना त्यांनी राज्यात दहा ठिकाणी सभा घेतल्या. निवडणुकीच्या प्रचारसभा सामान्यतः मते मागण्यासाठी असतात; परंतु या सभा वेगळ्या होत्या. एखाद्याला मते देऊ नका, असा प्रचार करणाऱ्या या दहा सभा केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही गाजल्या. ज्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेनंतर लगेच आंदोलने केली होती, त्या उत्तर भारतीयांनीही आपापल्या राज्यात त्या सभांचे व्हिडीओ दाखवले. यू-ट्यूबवर लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्‍स या सभांच्या व्हिडीओंना मिळत होते; परंतु इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातसुद्धा भाजप-शिवसेना युतीला प्रचंड यश मिळाल्याचे दिसले.

राज यांच्या सभांमुळे काही जागा युतीच्या खिशातून निसटतील, असे वाटत असताना असे का घडले? राज यांच्या सभांचा जो परिणाम वातावरणात दिसला, तो मतांमध्ये का दिसला नाही? आपल्या सभांचा परिणाम काय होईल, याबद्दल राज ठाकरे यांना कल्पना नव्हती का? मोदींची लाट 2014 प्रमाणे यावर्षी नव्हती, हे तर अनेकांनी बोलून दाखवले होते आणि बऱ्याच प्रमाणात ते खरेही होते; परंतु निकाल काही वेगळेच सांगत आहेत. अनेकांच्या अपेक्षा आणि अंदाजांना तडे देणारा हा निकाल आहे, हे मान्यच करावे लागेल. राज ठाकरे हे यापैकी एक नेते आहेत का? निकालानंतर त्यांना धक्‍का बसला असेल का? असे अनेक प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे.

राज यांनी जेव्हा मनसेच्या मेळाव्यात आपण प्रचारात उतरणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा त्यांचा पक्ष कॉंग्रेस आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढविणार, असे अनेकांना वाटले होते. काही नेत्यांबरोबर त्यांच्या गुप्त बैठका झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पत्रकार सातत्याने त्यांना याविषयी विचारत होते; परंतु अखेर राज यांनी एकही उमेदवार लोकसभेसाठी रिंगणात उतरविला नाही. शिवाय, माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या यासंदर्भातल्या बातम्या कशा चुकीच्या होत्या, हे आपल्या सभांमधून सांगितले. वस्तुतः लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे त्यांनी फार पूर्वीच जाहीर केले होते, हेही खरे आहे. त्यामुळे लोकसभेच्या प्रचारात उतरण्यात त्यांचा वेगळाच काही हेतू होता, हे उघड आहे. त्यांच्या सभांना “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ म्हणून हिणवले गेले; परंतु अशा हेटाळणीची दखलही न घेता, त्यांना जे बोलायचे होते, ते त्यांनी बोलून घेतले. याखेरीज निवडणुकीत सहभागी असलेल्या पक्षांच्या सभांपेक्षा त्यांच्या सभा अतिशय नियोजनबद्ध आणि आधुनिक तंत्राचा वापर करणाऱ्या होत्या. दोन्ही बाजूंना एलईडी स्क्रीन लावून मध्यभागी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या पोडियमवरून त्यांनी दहा भाषणे केली. ही मंचरचना सर्व सभांमध्ये सारखीच होती. आपल्याला टापटीप आणि कलात्मकतेची आवड असल्यामुळे आपण मंचरचनेचा खास विचार करतो, हे त्यांनी एका सभेत सांगितलेही.

वस्तुतः लोकसभेची ही निवडणूक इतकी एकतर्फी होईल, याची कल्पना केवळ राज ठाकरेच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील पंडितांनासुद्धा नव्हती. ती अशी एकतर्फी का झाली, याचे विश्‍लेषण यापुढे होत राहीलच; परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल; परंतु 2014 इतके बहुमत भाजपला किंवा रालोआला मिळणार नाही, असेच वातावरण अगदी निकालांपर्यंत होते, हे खरे आहे. म्हणजेच या निकालांमुळे अनेकांना धक्‍का बसलेला आहे, हे मान्य करावे लागेल. तरी आपण सभा घेऊनसुद्धा निकाल वेगळा लागू शकतो, याचा राज ठाकरे यांनी विचार केला नसेल का? असेल तर ते एवढे घणाघाती का बोलत होते? एवढे जळजळीत बोलून त्यांना किंवा त्यांच्या पक्षाला काय फायदा मिळाला? आता जे निकाल लागले, त्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे नुकसानच झाले नाही का? असे अनेक प्रश्‍न लोकांना पडतील; परंतु निकाल अनपेक्षित आहेत किंबहुना ते 2014 इतके अपेक्षित नाहीत, हे जर समजून घेतले, तर राज ठाकरे यांच्या सभांमागील प्रयोजन लक्षात येऊ शकेल.

महाराष्ट्रात विरोधी पक्षांची विशेषतः कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची काय स्थिती आहे, हे सर्वांना ठाऊकच आहे. मनसेची परिस्थितीही लपून राहिलेली नाही. त्या पक्षाकडे ना आमदार, ना खासदार. होते तेवढे नगरसेवकही शिवसेनेत गेलेले. अशा स्थितीत कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकणे राज ठाकरे यांना आवश्‍यक वाटले असेल आणि त्यासाठी त्यांना लोकसभा निवडणूक ही एक संधी वाटली असेल, तर तेही स्वाभाविकच आहे. त्यांची गाजलेली दहा भाषणे अशा काळात झाली आहेत, जेव्हा मनसेकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते आणि कमावले असते, तर बरेच काही कमावले असते.

आज विरोधकांची अवस्था केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात केविलवाणी आहे. अशा स्थितीत ही पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न काही नेत्यांकडून होणे अपेक्षितच आहे आणि राज ठाकरे यांचा तोही हेतू असणारच. त्यांच्या सभांचे मतदानात प्रतिबिंब दिसत नसले, तरी त्या सभा गाजल्या, हे अमान्य करता येत नाही. वर उल्लेखिल्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण मांडणी तर त्या सभांमध्ये होतीच; परंतु ज्या नरेंद्र मोदींविरुद्धचे सर्व आवाज अत्यंत क्षीण होते, त्यांच्या विरोधात परखडपणे बोलण्याने भक्‍कम नेता अशी प्रतिमा उभी करणे राज यांना शक्‍य होते आणि त्यांनी ती केलीही. निकालांमध्ये त्यांच्या सभेचे प्रतिबिंब पडले असते तर…? असा विचार केल्यास त्यांचा हेतू स्पष्ट होईल. अर्थात, त्यांनी कोणाला मत द्यायचे, हे कोणत्याही सभेत सांगितले नाही. ओघात बोलतानासुद्धा कधीही कॉंग्रेस वा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत द्या असे त्यांच्या तोंडून कधीच गेले नाही. जाणीवपूर्वक त्यांनी ते टाळले.

राज यांच्या सभांचा कुणालाच काही उपयोग झाला नाही आणि त्यांनाही काही उपयोग झाला नाही, असे म्हणणे घाईचे ठरेल. विधानसभेच्या निवडणुका हे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि ते सभांमधूनही त्यांनी जाहीरपणे सांगितले. पक्षाची प्रचंड पीछेहाट झाल्यानंतर त्याला उभारी देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. आज त्यांचे उमेदवार रिंगणात असते, तर ते पराभूत झाले असते. “”लाटांमध्ये सर्वच पक्षांचे नुकसान होत असते. जुन्या पक्षांचेही ते झाले. माझा पक्ष तर नवीन आहे,” असे सांगून त्यांनी आपल्या पक्षाची आजची अवस्था कायम अशी राहणार नाही, हेही सूचित केले.

मुळात ते जाहीरपणे स्वीकारले. परंतु त्यांचे उमेदवारच रिंगणात नसल्यामुळे सभांचा त्यांना तोटा होण्याचे काही कारण नव्हते. शिवाय, सभा गाजल्या म्हणूनच अनेक वाहिन्यांनी त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यातून भूमिका मांडण्याची त्यांना संधी मिळाली आणि निवडणुकीच्या रिंगणात नसतानासुद्धा सर्वाधिक गाजलेला स्टार प्रचारक, अशी ख्याती त्यांना मिळाली. निकालांनी सगळे वातावरण बदलले आहे; परंतु निवडणुकीपूर्वी जे वातावरण होते, त्याचा लाभ राज यांनी करून घेतला, हे नक्‍की. नजीकच्या भविष्यात त्याचे रूपांतर ते प्रत्यक्ष लाभात कसे करतात आणि त्यासाठी विधानसभेपूर्वी कोणती पावले उचलतात, हे
पाहावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here