समुद्र

संध्याकाळचा समुद्र मला नेहमीच दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून दमलेल्या मुलासारखा वाटतो. जणू घरी परतताना आता आईचा ओरडा खावा लागू नये म्हणून गुपचूप आजीच्या पदरात लपणारा खट्याळ लाडोबाच. हळूहळू सूर्य परतीच्या वाटेला लागतो. आपल्या किरणांचा पसारा आवरायला घेतो. सांजेचे पक्षी क्षीतिजावर अवतरतात. येताना आपल्या पंखांवर चांदण्या लपेटून आणतात. अशावेळी एकटक पाहत राहावं आभाळाकडे. तेव्हा आभाळातही एक समुद्र दिसायला लागतो.चांदण्यांचा समुद्र. चंदेरी लाटांनी नखशिखांत लगडलेला अंजोरी ठेवाच जणू.

जसजसा सूर्य अस्ताचलावरून परतीला निघतो तसतसं अजूनच समुद्राच्या काहूरलाटा स्पर्शविहीन शहारा पांघरू लागतात. मनाच्या चांदण्यात चंद्र वितळू लागतो उगवतीचा लालसपणा पांघरून. त्याचवेळी सूर्यास्त होतो. सूर्यास्त होताना समुद्र का शांत होतो माहितीये… कारण त्याचा बाप दूरदेशी निघालेला असतो. गर्दीत हरवलेलं पोर जसं कावरंबावरं होऊन शांत होत ना, तसंच असतं ते. उद्या पुन्हा सूर्य येईपर्यंतचा पोरकेपणा उराशी कवटाळत तो समुद्र पीत राहतो दिवसभर सूर्याने त्याच्यात ओतलेली ऊब, जी ऊर्जा म्हणून त्याला (समुद्राला) आपल्या लेकरांना द्यायची असते. तसंही नजरेला खुणावणाऱ्या सगळ्याच लाटा मनात उचंबळू द्यायच्या नसतात हे समुद्राचं शहाणपण त्याच्याकडून घ्यावं अशावेळी. शहाणपण असं तरी कसं म्हणावं हे हिंदोळे असतात त्याच्या मनाचे. म्हणून मग अनुभवांनी नकळत स्वीकारलेलं.

“तडजोडीकडे झुकणारं काहीसं’ असं म्हणावं. असं म्हटलं की मनात उठणाऱ्या लाटांचा मोह टाळता येतो. एव्हाना रुळलेल्या लाटा हळूहळू किनारा जवळ करू लागतात. या किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांना सोबत घेऊन चालताना बरेच काही क्षणांचे शिंपले जमा करतो आपण. काही अनुभवाचं देणंही जमा झालेलं असतं. ते सगळं हवं असलेलंच आहे याची मुळीच खात्री नसते. तरी ते हातातल्या ओंजळीत साठतच राहतं… वाटतं ओंजळीतल्या फटींमधून झरणाऱ्या वाळूसारखं जे नकोसं आहे ते झरून जावं; पण पुन्हा मन काहूरतं… वाटतं की, हवंय तेही झरून गेलं तर? मनात विचार येतोच, किती आणि कायकाय साठवलेलं ओझं हा समुद्र आपल्या खांद्यावर वागवतो, तरीही शांत, स्थिर, गंभीर…

असेच काहीबाही शंख-शिंपले ओंजळीत गोळा होत राहतात. काही शिल्लक राहतात. काही वाळूसोबत गळून जातात. मनात समुद्र आकारत जातो… शांत, स्थिर, खोल… जसा समोर दिसतो. सांत्वनाचे चार तुषार उडतात अंगावर. लाटांची फुले पायाखाली अंथरली जातात. ती मात्र खरी असतात. कधी टोचतात, कधी सुखावतात. आपण एकच करावं, डोळे मिटून स्वतःला किनाऱ्यावर ठेवत लाटांसोबत चालत रहावं. या समुद्राने देऊ केलेल्या शहाणपणाकडे; अचानक मिळालेल्या बक्षिसासारखं अनिमिष डोळ्यांनी पाहत राहावं आणि त्या शहाणपणाच्या कुशीत मिटून जाताना मनाला पुन्हा लाटांच्या स्वाधीन करावं, जशा एखाद्या कुजबुजत्या दुपारी विसाव्याला टेकलेल्या बाया पदर कानामागे सारून एकमेकींना मायाळू सावली देतात ना, तशाच लाटा मनाला निगुतीने झुलवतात…

त्यावेळी समुद्र मात्र पहूडलेला असतो. सारस पक्ष्याच्या विसावलेल्या देहागत. अवतीभोवती असलेल्या माडांचे पंख लपेटून. अवतरलेल्या चांदणरात्रीला कुशीत घेत तो अजूनच गप्प होतो आणि चांदण्यांना लाटांवर खेळायला सोडून मिटत जातो मनाच्या विजनात. समुद्र झोपी जातो… देहातला, मनातला आणि डोळ्यातलाही…

मानसी चिटणीस

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.