वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी गुन्हेगारांची झाडाझडती
पुणे – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुन्हेगारी संपविण्याची घोषणा केल्यानंतर गुन्हे शाखेकडून सराईत, संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांतील सदस्यांची हजेरी घेण्यात येत आहे. त्यांना गुन्हे शाखेत बोलावून त्यांची झाडाझडती घेतली जात आहे.
त्यांचा सध्याचा पत्ता, मोबाइल नंबर आणि हालचालीसंदर्भात नोंद करून घेतली जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांना गुन्हे न करण्याची तंबी दिली जात आहे. गुन्हे शाखेबरोबरच पोलीस ठाण्याच्या पातळीवरही झाडाझडती सुरू आहे.
गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच शहरात दहा दिवसांत सहा खूनाच्या घटना घडल्या. त्याचबरोबर जबरी चोरी, घरफोड्याचे गुन्हेदेखील वाढले आहे. पुढील कालावधीत करोनामुळे वाढलेल्या बेरोजगारीतून गुन्हेगारी घटना घडू शकतात, त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाचा बंडगार्डन येथे गोळीबार करून खून केला.
त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी हे सर्व गंभीर गुन्हे काही तासांत उघडकीस आणले. गुन्हे उघडकीस येत असले तरी ते होऊच नये यासाठी पोलीस आयुक्तांनी प्रयत्न सुरू केले आहेत.