मिनेपोलिस: अमेरिकेत एका कृष्णवर्णीय कैद्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर सुरू झालेल्या निदर्शनांची व्याप्ती रविवारी पुन्हा वाढली असून अनेक ठिकाणी जाळपोळ, हिंसाचार आणि लुटालुटीचेही प्रकार घडले आहेत. मिनेपोलिस येथे शांततेने निदर्शने करणाऱ्या एका जमावावर ट्रक घुसवण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर रविवारी पुन्हा देशाच्या अनेक भागात हिंसक प्रकार सुरू झाले. सुदैवाने जमावात ट्रक घुसवण्यात आल्याच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. चाळीस शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून हजारो निदर्शकांना तेथे अटक करण्यात आली आहे.
निदर्शनांची व्याप्ती बोस्टन ते सॅन फ्रान्सिस्को अशी आहे. फिलाडेल्फिया, सांता मोनिका, कॅलिफोर्निया, अशा ठिकाणी दिवसाढवळ्या लुटालूट सुरू आहे. अमेरिकेत फ्लॉयद नावाचा एक इसम पोलीस कोठडीत मारला गेल्याची घटना घडल्यानंतर गेल्या आठवड्यापासून तेथे ही निदर्शने सुरू आहेत. निदर्शकांनी अनेक इमारतींना आगी लावल्याचे प्रकार घडल्याने अनेक ठिकाणी नॅशनल गार्डना तैनात करावे लागले आहेत.
दरम्यान, प्रशासनाने त्या कृष्णवर्णीय कैद्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ केले असले तरी त्या घटनेच्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य तीन अधिकाऱ्यांच्या विरोधातही खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे करीत निदर्शकांनी सारी अमेरिका अस्थिर केली आहे. निदर्शकांनी तोडफोड किंवा जाळपोळ करून मालमत्तेची जी हानी केली आहे त्याची अजून मोजदाद झालेली नाही पण एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राचे जितके नुकसान व्हावे तितक्या तीव्रतेचे नुकसान अमेरिकेत झाले आहे.