संच मान्यतेच्या सुधारित निकषास विरोध

शाळा मुख्याध्यापक नाराज : तिव्र आंदोलनाचा पवित्रा

 

पुणे – राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदांच्या संच मान्यतेसाठी सुधारित निकष लागू करण्यास पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने तीव्र विरोध दर्शविला.

शालेय शिक्षण विभागाने शाळांमध्ये संरचनात्मक बदल करून व संचमान्यतेबाबतचे सुधारित निकष तयार करून “आरटीई’च्या नियमांची अंमलबजावणी सुरु केली. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी संच मान्यतेसाठी सुधारित निकष लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठविला आहे.

 

यातील शिफारशी या विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताला बाधा आणणाऱ्या आहेत.
विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्यास शाळांमधील शिक्षक संख्या कमी होणार आहे. विविध विषयांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. शहरी व ग्रामीण भागातील अनुदानित शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

 

स्वयंअर्थसहाय्यित शाळांची फी सर्वसामान्य पालकांना परवडणारी नाही, असे मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षा अनिता साळुंके, सचिव सुजित जगताप, प्राचार्य अविनाश ताकवले, उपाध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिवाजी कामथे, रोहिदास भारमळ यांचे म्हणणे आहे. त्यांनी पुणे शहराच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना निवेदन दिले. त्यांच्यामार्फत शासनाला हे निवेदन पाठविण्यात येणार आहे.

 

शासन विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शिक्षण आयुक्तांचे संच मान्यतेसाठी सुधारित निकष लागू करण्याचे पत्र रद्द करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मुख्याध्यापक संघाने दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.