नववर्षात शाळेची घंटा वाजणार! पुण्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – पुणे महानगरपालिका हद्दीतील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 4 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी गुरूवारी काढले. वर्ग सुरू करताना शासनाच्या नियमांचे पालन करण्याने बंधनकारक असणार आहे.

नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. करोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते.

करोनामुळे मार्चमध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यानंतर नऊ महिन्याचा कालावधी उलटला तरीही अद्याप शाळा सुरू झालेल्याच नाहीत. शहरातील परिस्थिती पाहून शाळा 3 जानेवारीपर्यंत सुरू न करण्याचा निर्णय महापालिकेकडून पाठीमागे घेण्यात आला होता. मात्र, आता परिस्थिती काहीशी नियंत्रणात असल्याने 4 जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

वर्ग सुरू करताना शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन शाळा आणि महाविद्यालयांना करावे लागणार आहे. शाळेत स्वछता राखणे तसेच निर्जंतुकीकरण करने बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांची थर्मल गन ने तसेच पल्स ऑक्‍सिमीटरने तपासणी करणे आवश्‍यक आहे. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करणे बंधनकारक आहे.

“एका बाकावर एक’ अशी बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापूर्वी पालकांची लेखी संमती शाळा प्रमुखांना सादर करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे.

मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवणे आवश्‍यक आहे, याबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स/स्टिकर्स शाळेच्या दर्शनी भागात लावणे आवश्‍यक आहे. शाळेत येण्या-जाण्याचे मार्ग निश्‍चित करणाऱ्या बाणाच्या खुणा करणे आवश्‍यक आहे, हे करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे.

शाळा सुरू करण्याची पूर्व तयारी म्हणून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 28 डिसेंबरपासून शाळेत उपस्थित राहण्याच्या सुचना शाळांना कराव्या लागणार आहेत. महापालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेशाचे पालन करण्यात यावे, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.