पिंपरी – मुस्लिम समाज बांधवांमध्ये अत्तर आणि सुरम्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्यांचा रमजानचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त बाजारात विविध प्रकारचे अत्तर आणि सुरमा विक्रीसाठी आले आहेत. त्याचा सुगंध बाजारात दरवळला आहे. पिंपरीतील सुगंधालयांमध्ये अत्तरासह सुरम्याला मोठी मागणी वाढली आहे. उंची अत्तरालाही तेवढीच मागणी आहे.
करोनामुळे सण-उत्सव साजरे करता आले नाही. त्याचा परिणाम बाजार पेठेवरही झाला. त्यामुळे विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. यंदा मात्र, सर्व नियम शिथिल केल्याने विक्रेत्यांचा उत्साह वाढला आहे. विक्रीसाठी खास मुंबई आणि इतर ठिकाणाहून विक्रीसाठी अत्तर आणले जाते. त्याचा सुगंध बाजारपेठेत दरवळला आहे.
तर, खरेदीसाठी समाज बांधवांची वर्दळ वाढली आहे. रोजा सोडल्यावर काहीजण सायंकाळनंतर पिंपरी आणि उपनगरांतील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. मुस्लिम समाज बांधवांमध्ये अत्तर आणि सुरम्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजात अत्तर, डोळ्यांत सुरमा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे रमजानच्या सणासाठी सुरमा, अत्तरची खास खरेदी केली जाते. ग्राहकांच्या मागणीचा विचार करून आणि त्यांना परवडेल अशा दरात ते उपलब्ध करून दिले जात आहेत. सुरमा, सुरमेदानीचीही विक्री वाढली आहे. 30 रुपयांपासून ते 5 हजार रुपये दहा ग्रॅम असे अत्तराचे दर आहेत.
आकर्षक सुरमेदानी
डोळ्यात सुरमा लावण्याची खास पद्धत असते. काचेच्या काडी सुरम्यामध्ये बुडवून ती डोळ्यात लावली जाते. सुरम्यामध्ये खस, मुमताज, डेनिम, सपारी यांना मागणी असते. 10 ग्रॅमची किंमत 30 रुपयांपासून पुढे आहे. सुरमा आणि तो ठेवण्यासाठी सुरमेदानीचीही खरेदी केली जात आहे. रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात सुरम्याची विक्री होते, असे विक्रेत्यांनी सांगितले.