पुणे -लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. त्यात शालेय साहित्य विक्रीची दुकानेही सुरू झाली आहेत. दरवर्षी, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी आप्पा बळवंत चौकात होत असते. यंदा, मात्र त्या तुलनेत करोनामुळे साहित्य खरेदीसाठी पालक अजून घराबाहेर पडले नसल्याचे चित्र आहे. यावर्षी आरोग्याच्या सुरक्षिततेच्या कारणावरून मुले बाजारात न येता पालकवर्गातून खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे.
शाळा सुरू होताना नवीन गणवेश, नवीन दप्तर, वह्या पुस्तके, कंपास बॉक्स, ड्रॉईंग साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असते. यंदा मात्र तसेच चित्र पाहावयास मिळत नाही. शालेय शिक्षण विभागाने येत्या 15 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सर्वच शालेय साहित्य खरेदी करण्याऐवजी केवळ वह्या आणि अन्य वस्तूंची विक्री होत असल्याचे दिसून आले.
आप्पा बळवंत चौकात आज शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची उपस्थिती कमी प्रमाणात होती. त्यावरून अजूनही खरेदीसाठी पालकांचा उत्साह नव्हता. करोनामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यातच शाळांनी ऑनलाइनद्वारे शुल्क भरण्याचा तगादा लावला आहे. अशा परिस्थितीत मुलांचे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी काही पालकांची परिस्थिती नाही. त्यामुळे जेवढे शक्य आहे, तेवढेच साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसून आले.
प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होतील, याविषयी काहीच कल्पना नाही. त्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागेल, असेही पालकांना वाटत आहे. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी अतिघाई न करता पुढच्या महिन्यात पाहू, असे नियोजन पालकांतून होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होताना दिसत नाही.