दोन वर्षांसाठी खरेदीला स्थायीची मान्यता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर रुग्णालयात सध्या सुरू असलेला औषधांचा तुटवडा संपुष्टात येणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या औषध खरेदीचा विषय आज मार्गी लागला. पुढील दोन वर्षांसाठी औषध खरेदी करण्यास मान्यता देत 16 कोटी 49 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. आज औषध खरेदीला मान्यता मिळाल्यामुळे तुटवडा संपुष्टात येणार आहे.
ऍलोपॅथी औषधांसाठी महापालिकने निविदा प्रक्रिया राबविली होती. विविध प्रकारच्या 690 औषधांच्या बाबींसाठी ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. औषध निवड समितीने यातील 7 बाबी वगळल्या असून उर्वरित 683 बाबींच्या औषधांच्या खरेदीचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
पुढील दोन वर्षांसाठी वरील बाबींची सर्व औषधे 19 निविदाधारक कंपन्यांकडून खरेदी करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. तसेच यासाठी येणाऱ्या 16 कोटी 49 लाख 60 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.