लोकवस्तीमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर वाढला

मंचर – आंबेगाव तालुक्‍यातील सुलतानपूर येथील शेतकरी गंगाराम महादेव शिंदे यांच्या शेळीवर बिबट्याने मंगळवारी (दि. 9) पहाटे हल्ला करुन ठार केले आहे. परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्‌यामुळे शेतकरी भयभीत झाला असून वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिबट्याने जनावरांच्या गोठ्यामध्ये हल्ला करुन चार महिन्याची गर्भवती शेळी उचलून उसाच्या शेतात फरफटत नेऊन ठार केली. यामध्ये शेतकरी गंगाराम शिंदे यांचे अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. मागील वर्षी बाळासाहेब शिंदे यांची कालवड बिबट्याने ठार केली होती.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी पुणे जिल्हा अपंग प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी बंदिस्त गोठे बांधून घेणे गरजेचे असून नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.