पुणेकरांनी जपले राष्ट्रध्वजाचे पावित्र्य

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमानंतर रस्त्यावर ध्वज टाकण्याचे प्रमाण कमी


भारत फ्लॅग फाउंडेशनने केलेल्या जागृती आणि प्रबोधनाचा प्रभाव

पुणे – प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज पडलेले दिसत होते. मात्र, यावेळी पुणेकरांनी राष्ट्रध्वजाचे पावित्र्य जपले आहे. वारंवार कराण्यात आलेल्या जागृतीमुळे आणि प्रबोधनामुळे याचे प्रमाण कमी झाले असल्याचे यावेळी प्रजासत्ताक दिनानंतर दिसून आले.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे राष्ट्रीय सण देशभरात उत्साहात साजरे केले जातात. यावेळी अनेक जण राष्ट्रध्वज अभिमानाने खरेदी करतात. मात्र, राष्ट्रीय दिन झाल्यानंतर या राष्ट्रध्वजाचे काय करायचे, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात असतो. तर काही जणांना काय करायचे हे माहिती नसल्याने तो काही दिवस घरामध्ये जपून ठेवला जातो. परंतु, त्यानंतर घराची स्वच्छता मोहीम काढल्यानंतर त्याचे काय करावे, या विचारातून तो कचऱ्यात टाकला जातो.

राष्ट्रध्वज अशाप्रकारे कचऱ्यात किंवा रस्त्यावर टाकायचा नसतो, अशाप्रकारे त्याचा अवमान होण्यापेक्षा त्याला नष्ट करण्यासाठी काही राष्ट्राचे नियम आहेत (फ्लॅग कोड) जे कायद्याने बंधनकारक आहेत. याची माहितीच अनेकांना नसते. त्यामुळे मुळात तत्संबंधी जागृती होणे अधिक आवश्‍यक आहे. तोच धागा पकडून “भारत फ्लॅग फाउंडेशन’ने यासंबंधी कार्य उभे केले आहे. हे ध्वज शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे कार्य हे फाउंडेशन करते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतेही. मागील 19 वर्षांपासून राष्ट्रध्वज संकलित करून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची ही मोहीम राबवण्यात येत आहे.

फाउंडेशनचे संस्थापक गिरिश मुरूडकर आणि कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सदस्य 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीनंतर राष्ट्रध्वजाचे संकलन करण्याचे काम शहर तसेच उपनगरातील विविध भागात करत असतात.

भावना रूजवणे महत्त्वाचे…
कागदी राष्ट्रध्वजावर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु, लहान मुलांना राष्ट्रध्वज देताना, ते खेळणे नसल्याची भावना रूजवणे जास्त महत्त्वाचे आहे. राष्ट्रध्वज सांभाळता आला पाहिजे. त्याचा मान राखता येणे आवश्‍यक आहे, हे लहान मुलांना सांगणे गरजेचे आहे. दरम्यान, पूर्वी प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाच्या विक्रीचे प्रमाण अधिक होते. प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होणाऱ्या भागांमध्ये आम्ही प्रबोधन केले. संबंधित विक्रेत्यांनी देखील सहकार्य केले. प्लॅस्टीक जळत नसल्याने आम्ही प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक वितळवून, ते “पुर्नवापरा’साठी देतो, असे गिरिश मुरुडकर यांनी सांगितले.

पुणे शहर आणि जवळपासच्या परिसरातून मागील काही वर्षांच्या तुलनेत दोन ते तीन बॉक्‍सचे संकलन झाले आहे, ही समाधानकारक बाब आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आधी सुमारे दोन हजारांहून अधिक ठिकाणी याबाबतची पत्रके वाटण्यात येतात. तर नंतर ध्वजारोहणानंतर रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज संकलित करण्यात येतात. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक संस्था, संघटना या उपक्रमात सहभागी होत आहेत. या मोहिमेला तरूणाईकडून चांगला प्रतिसाद आहे. मुख्यत: राष्ट्रध्वज हा कागदी तुकडा नसून आपली अस्मिता आहे. तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे, ही बाब नागरिकांनी लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे.
– गिरिश मुरुडकर, भारत फ्लॅग फाउंडेशन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.