आज सुधारित आदेश
पुणे – राज्यशासनाकडून 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी शहराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे शहरातही लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून त्याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. दरम्यान, पुण्यात कोणतेही नवीन नियम लागू करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले की, कोणतेही व्यवसाय सुरू करण्याबाबत परवानगी दिली जाणार नाही की सुरू करण्यात आलेल्या व्यवसायांवर बंदी घातली जाणार नाही. दुकानांच्या वेळा, संचारबंदी, दुकानांसाठीचे नियम, प्रवासी वाहतुकीचे नियम सर्व “जैसे थे’ असणार आहेत.
नवे कंटेन्मेंट झोन जाहीर करणार…
आज नवे कंटेन्मेंट झोन जाहीर केले जाणार आहेत. यापूर्वी 17 जूनला झोन जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुमारे 65 टक्के रुग्ण हे शहरातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सापडल्याने शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या, शहरात 73 झोन असून शहराचे सुमारे साडेसहा चौरस किलोमीटर क्षेत्र कंटेन्मेंट झोन आहे. मात्र, मागील 15 दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या पाहता हे झोन 100 च्यावर जाण्याची शक्यता आहे.