जुन्नर(प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन सुरू असून जुन्नर शहरात मात्र शटर बंद करून सलूनमध्ये काम सुरू असल्याचे आज (दि. २) उघडकीस आले आहे. मात्र याप्रसंगी फेशियल आणि दाढी करून घेणारे हे कोणी सामान्य नागरिक नसून ते बंदोबस्तावर असलेले राखीव पोलिस दलाचे दोन जवान होते. त्यांना जुन्नर शहर नाभिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन कालेकर व शहर अध्यक्ष सतीश डाके यांनी रंगेहाथ पकडले आहे. याबाबतची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वसामान्यांना हातातल्या काठीने जरब बसविणारे पोलिसच कायदा मोडत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शहरात इमारतींची बांधकामे सुरू असल्याचे प्रकरण ताजे असतानाच हे केशकर्तनालयाचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भर बाजारपेठेतील पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यात असणाऱ्या या दुकानात शटर लावून राजरोसपणे दाढी कटिंग केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यातच पोलिसच दुकानात येत असल्याने चालकाची अरेरावी वाढली होती. त्यामुळे या सलून चालकासह त्या जवानांवर कारवाई करण्याची मागणी कालेकर यांनी केली आहे.