सातारा – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सातारा जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बंद असलेली दारूची दुकाने उद्या, दि. 13 पासून सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध नियम व अटी घालून परवानाधारकांना सीलबंद दारू विकण्यास परवानगी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र पूर्वीप्रमाणेच मनाई आदेश लागू राहणार आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील दारूची दुकाने गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने शासनाला मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे महसुलासाठी मद्य विक्री सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारवर दबाव होता. गेल्या दीड महिन्यात दारू दुकाने बंद असली तरी मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू विक्री झाली. त्यातून सरकारला महसूल मिळाला नाही, उलट मद्य विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी आपले हात ओले करून घेतले. त्यात मद्यपान करणाऱ्या नागरिकांना फटका बसला.
दारूची दुकाने काही नियम व अटी घालून अगदी रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्येही सुरू करण्याची मार्गदर्शक सूचना शासनाकडून देण्यात आली होती. मुंबई-पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू झाली तरी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन थोड्या विलंबाने मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. या आदेशान्वये केवळ सीलबंद दारू विक्रीस परवानगी आहे.
ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू करता येतील तर शहरी भागात मॉल, बाजार संकुलातील दारूची दुकाने सुरू करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ दारू विक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील अनुज्ञप्तीप्राप्त दुकाने सुरू करता येणार आहेत; परंतु प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच ती सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
दारूच्या दुकानासमोर 25 पेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी असता कामा नयेत. या व्यक्तींनी तोंडाला मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी परवानाधारकाची राहील. संबंधित परवानाधारकाने दुकानातील नोकरांचे, ग्राहकांचे थर्मल स्क्रीनिंग करावे. दुकानदार व कामगारांनी मास्क, हॅंडग्लोव्हज्चा वापर बंधनकारक आहे सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींना दुकानात प्रवेश देऊ नये.
दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुक करणे बंधनकारक आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. संबंधित परवानाधारकांनी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत दुकाने सुरू ठेवायची आहेत. या व्यतिरिक्त दुकाने सुरू ठेवल्यास परवाना रद्द करून पुढील कारवाई केली जाईल. ग्राहकांना सीलबंद दारू विकावी. दुकानात ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करू नये. तसे निदर्शनास आल्यास संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.