परिवहन विभागाकडून कारवाईचा इशारा
जळोची -“हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट काही वाहन कंपन्या स्वत:च वाहनांना बसवून देत आहेत. बहुतांशी करून बाहेरील कंपन्या हा नियम पाळतात, ही बाब स्वागतार्ह असली तरी काही जण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणून डुप्लीकेट नंबर प्लेट वाहनांना लावतात. परंतु, ही बाब नियमबाह्य असून डुप्लीकेट हाय सिक्युरिटी प्लेट बेकायदा समजून ती बनविणाऱ्या तसेच बसविणाऱ्या संबंधीत वाहन चालकांवर कारवाई करण्यात येईल, असे बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.
“हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेटबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच “काका…,मामा…’ अशी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू करण्याबाबतचे आदेश धायगुडे यांनी दिले. याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वाहनांना हायसेक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहेच, याची अंमलबजावणी मध्य प्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रात सुरू होणार होती. परंतु, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशा नंबर प्लेट कोण तयारी करणार, की वाहन कंपन्यांनाच त्या बसवाव्या लागणार याबाबतचा निर्णय झालेला नाही. तरीही काही वाहन कंपन्या स्वत: हा नियम पाळत आहेत, ही बाब चांगली आहे. परंतु, केवळ वाहतूक पोलीसांनी कारवाई करू नये म्हणून काही जण हाय सिक्युरिटी प्लेटच्या नावाखाली चुकीच्या नंबर प्लेट वाहनांवर बसवितात, हे चुकीचे आहे.
राज्यातील स्वयंचलित वाहनांना केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989च्या नियम 50 नुसार हायसेक्युरिटी नंबरप्लेटचा नियम लागू होणार असल्याने काही वाहनांना अशा प्लेट दिसतात. मात्र, अधिकृत “हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट तयार करणाऱ्यांबाबत शासनाकडून कुठलीही माहिती अद्यापही जाहीर करण्यात आलेली नसताना, अशा नंबर प्लेट वाहन चालकांना विक्री केल्या जात आहेत, त्या अनधिकृत असून अशा डुप्लिकेट “हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट तयार करणाऱ्यांवर तसेच वाहन चालकांवरही कारवाई करण्यात येऊ शकते.
शासनाने अद्याप हाय सिक्युरिटी नंबर प्लेटबाबत तत्वत: कार्यवाही सुरु केलेली नाही. काही वाहन विक्रेते व नंबर प्लेट बनवणारे खासगी विक्रेते डुप्लिकेट “हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट घेण्यास वाहन धारकांना भाग पाडत असून ही बाब बेकायदेशीर आहे. सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसारच नंबर प्लेट आपल्या वाहनांवर लावाव्यात. यात कोणतेही कलात्मक बदल नसावेत.
-संजय धायगुडे, बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी