टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन थांबवावे 

शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र; संस्थांकडून मागवली माहिती, कारवाईच्या संकेतामुळे खळबळ

सातारा  – राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या निकषानुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती अद्यापही शिक्षण विभागास संबंधित संस्थांनी दिली नाही. पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या सूचना असतानाही अद्यापही वेतन अदा केले जात आहे. वास्तविक जे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यांची माहिती तात्काळ शिक्षण विभागास देऊन त्यांचे वेतन तात्काळ थांबवण्यात यावे, असा इशारा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना पत्राद्वारे दिल्याने खळबळ उडाली आहे.

शिक्षणाचा दर्जा सुधारावा, भावी पिढी आणखी सक्षम व्हावी, या उद्देशाने शिक्षण विभागाने एक अध्यादेश काढून सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक केले होते. मात्र, अद्यापही अनेक शिक्षक टीईटी परीक्षा पास झालेले नसल्याने त्याचा विपरित परिणाम शिक्षणावर होत आहे.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार टीईटी अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांवर संबंधित संस्थांनी कारवाई करणे गरजेचे आहे.

पात्रता परीक्षा पास नसणाऱ्या शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या सूचना असतानाही अद्याप संबंधितांना वेतन देण्यात येत आहे. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती शिक्षण विभागास देऊन त्यांचे वेतन तात्काळ थांबवावे, अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी केल्या आहेत.

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती वारंवार मागवूनही संस्थांकडून त्याची माहिती मिळत नाही.
याबाबत अनेकदा वरिष्ठ कार्यालयाकडून विचारणाही झाली आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनी अशा शिक्षकांची तात्काळ माहिती देवून त्यांचे वेतन थांबवावे. संबधितांचे वेतन सुरु ठेवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थांची राहणार आहे. संबंधित शिक्षकांची माहिती न दिल्यास त्यांची वेतन देयके स्वीकारली जाणार नसल्याचा इशाराही क्षीरसागर यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.