देऊळगावराजे -प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या विलंबाने होणाऱ्या पगाराला जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन गटविकास अधिकारी गणेश मोरे यांना दौंड तालुका कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीचे अध्यक्ष आप्पा जगताप यांनी दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, दौंड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑगस्ट 2020च्या पगारासाठीची रक्कम पुुणे जिल्हा परिषद प्रशासनाने 8 सप्टेंबर 2020 रोजी उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु पंचायत समितीतील पगारासंबंधीच्या ढिसाळ नियोजनामुळे पगाराला विलंब होत आहे.
त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना आपले बॅंका, पतपेढ्यांचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नसल्यामुळे त्यावर अधिकचे व्याज भरावे लागत आहे. कुटुंबीयांचे आजारपण, पाल्यांचे शिक्षण व विविध अडचणी उद्भवतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या विलंबास जबाबदार दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, दौंड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना जेवढे आर्थिक नुकसान पगाराच्या विलंबामुळे सोसावे लागले आहे.
एवढी रक्कम या कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी आणि ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यास आपणास कोणतीही पूर्व सूचना न देता संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.