अभिवादन: माणसात देव पाहणारा संत

विठ्ठल वळसे पाटील

समाजाला शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता आणि चारित्र्य यांची शिकवण देत अंधश्रद्धा व अज्ञान समूळ नष्ट झाले पाहिजे, यातूनच मानवाचे कल्याण व समृद्धी होत असल्याचा मंत्र गाडगेबाबा यांनी गावो गावी जाऊन दिला. माणसात व स्वच्छतेत देवपण शोधणारा एक थोर निष्काम कर्मयोगी म्हणजेच राष्ट्रसंत गाडगेबाबा होय. आज त्यांचे पुण्यस्मरण दिन त्यानिमित्त…

भारतात पारतंत्र्य काळात स्वातंत्र्यासाठी धगधगत्या अग्निकुंडात आत्मसमर्पण करणारी क्रांतिकारी पिढी जन्म घेत असताना देशात अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड यांनी देश अधोगतीला गेला होता. त्याच काळात विज्ञानाची कास, समाजसुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन करण्याऱ्या मंडळीनीही जन्म घेतला. गावो गावी जाऊन समाजाला लोकशिक्षण देणारे संत गाडगेबाबा हे समाज सुधारणेतील एक महान राष्ट्रपुरुष होय. त्यांनी आपल्या कीर्तनातून व भजनातून समाजाचे प्रबोधन केले शिवाय अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड यांवर प्रखर हल्ला चढवला. नि:स्वार्थी सेवेचे कंकण त्यांनी हाती बांधले होते. रंजल्या, गांजल्यांसाठी त्यांचा प्रेमाचा झरा कधी आटला नाही. अंध, अपंग, रोगी, अशिक्षित, दिन दुबळ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी अवघ्या समाजाचा संसार केला.

बाबा म्हणतात- शाळेहून नाही थोर ते मंदिर। देणगी उदार शाळेला द्या।। ज्ञान मंदिर हेच श्रेष्ठ मंदिर आहे. याच ज्ञान मंदिरातून उद्या देशाचे भविष्य घडणार आहे. त्यांचे काव्य व भजन सहज समजणारे असल्याने समजला पटत असत. “गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ हे भजन गात असताना लोक जमू लागत व भजनाची सुरुवात झाल्यावर बाबा प्रबोधनातून समाज्याच्या हिताच्या गोष्टी सांगत. डोक्‍यावर फुटके मडके, एका हातात काठी, दुसऱ्या हातात झाडू असा संत गावात येऊन अगोदर स्वच्छतेला महत्त्व देऊ. सारे गाव स्वच्छ झाले की बाबा कीर्तन करत. गाडगे बाबांनी महाराष्ट्र फिरत असताना सामाजाची दैनावस्था पाहिली. त्यांनी समाजाला दशसूत्री दिली.

ते म्हणतात, “जे रंजले गांजले आहेत, दुःखी निराश आहेत अशांना जगण्याची उमेद द्या, मुक्‍या प्राण्यांना अभय द्या, गोरगरिबांच्या मुलामुलींचे लग्न करून त्यांचे संसार उभे करा, उघड्या नागड्यांना वस्त्र तर बेघरांना आश्रय द्या, बेकारांच्या हाताला काम द्या, सावकाराकडून कर्ज काढून कार्य करू नका, दारू, व्यसने करू नका, प्राण्यांची हत्या करू नका, चैन उधळपट्टी करू नका, कष्ट केल्याशिवाय भाकरी घेऊ नका. बाबांनी दशसूत्रीमध्ये अज्ञानाकडून ज्ञानाच्या पर्वाची वाट दाखविली. त्यांनी कष्टाला व श्रमालाही प्रतिष्ठा दिली. समाजाच्या उद्धारासाठी कामी येण्याचे आवाहन केले. या जगात करण्यासारखे खूप काही असूनही समाज डोळसपणे पाहत नाही, अशा समाजाला त्यांनी नवं विचारांची दृष्टी दिली.

देहू, आळंदी, पंढरपूर, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. धर्म व वर्ण यांतील भेद त्यांच्याजवळ नव्हताच. संत माणूस म्हणून पाया पडायला येणाऱ्या माणसाला ते रोखत असत व पडणाऱ्याला काठीचा प्रसाद मिळत असे. आपल्या जन्मदात्यांच्या पाया पडा, असा उपदेश करीत असत. त्यामुळे समतेचे ते पुरस्कर्ते होते. “मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्याभोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषा वऱ्हाडी बोलीचा वापर करत. बाबा अंधश्रद्धा व त्यावर केलेल्या अफवांचा आधार घेत लोकांना प्रश्‍न विचारत आणि त्यांच्या तोंडून उत्तर घेत त्यांना मार्गदर्शन करत.

डेबूजी अर्थात गाडगे बाबा लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणी गुरे राखणे, शेतीवाडीची कामे ते करत असत. फकीर वृत्ती धारण केलेल्या माणसाने आपले सारे आयुष्य हे समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छतेचा मूलमंत्र, शिक्षण व आरोग्याचे महत्त्व विशद करत घालवले. त्यांनी समाजसुधारणेचा वारसा चालवणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. 20 डिसेंबर 1956 रोजी या महान राष्ट्रसंतांने जगाचा निरोप घेतला.

संत गाडगे बाबांच्या पश्‍चात त्यांचे अद्वितीय कार्य आपल्यासाठी अंतिम सत्य ठरले आहे. गाडगे बाबांनी स्वच्छतेचा व ग्राम समृद्धीचा मंत्र दिला तो लक्षात घेत शासनाने सन 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. पाहता पाहता ही एक लोकचळवळ स्वरूपात उभी राहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.