महामार्गावरील चोऱ्या रोखण्यासाठी कुमक मिळणार

-महामार्ग पोलिसांची गंभीर दखल

पुणे –
सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या पुणे- मुंबई एक्‍स्प्रेस वे मार्गावर चोऱ्यांचाही “वेग’ वाढला आहे. त्यामुळे हा महामार्ग प्रवासी आणि वाहनचालकांसाठी रात्रीच्या वेळी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या प्रकाराची महामार्ग पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या महामार्गावरील गस्त आणखी वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी मुख्यालयाकडे आणखी कुमक मागविण्यात आली आहे, ही कुमक देण्याची तयारी मुख्य कार्यालयाने दर्शवली आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर वाहनचालकांना आणि प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: घाटमाथ्यावर हे प्रमाण सर्वाधिक आहे, त्यासंदर्भात काही प्रवाशांनी महामार्ग पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलीसांच्या वतीने या चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र, हे चोरटे चोऱ्या करुन तातडीने पसार होत असल्याने त्यांचा शोध लागू शकला नव्हता. हे वास्तव असले तरीही यापुढील कालावधीत अशा घटना घडू नयेत आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महामार्ग पोलिसांनी कंबर कसली आहे.

या महामार्गावर महामार्ग पोलिसांचा पन्नास अधिकारी आणि सातशे कर्मचारी असा ताफा तैनात आहे. हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिवस रात्र या महामार्गावर गस्त घातली जाते, विशेष म्हणजे घाट माथ्यावर या गस्तीचे प्रमाण सर्वाधिक आहे. चोऱ्या रोखण्यासाठी गस्त आणखी वाढविण्यात येणार आहे, गरज भासल्यास त्याठिकाणी काही वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.