अर्ज भरण्याची मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत
उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 5 ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – दि. 7 ऑक्टोबर
पुणे – पितृपंधरवडा संपल्याने आता नवरात्रीचा मुहूर्त साधून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून (दि.30) गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे चार दिवस राहिले आहेत.
जिल्ह्यातील 21 विधानसभेच्या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि.27) सुरुवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात फक्त वडगावशेरी आणि इंदापूर या दोन ठिकाणांहून दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीची घोषणा झाली आहे. त्यांची उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. मात्र शिवसेना-भाजप यांच्या युतीच्या चर्चा सुरू असून त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चार दिवस राहिल्याने इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले असून आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.
उमेदवारी अर्ज संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत भरता येणार आहेत. विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा
समावेश होतो.
मतदारसंघाचे नाव – मतदारसंघाचे कार्यालय
वडगावशेरी – येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय, येरवडा
शिवाजीनगर – पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड
कोथरुड – जुने कर्वे रोड क्षेत्रिय कार्यालय मध्य रेल्वे आरक्षण केंद्राशेजारी कर्वे रोड
खडकवासला – हवेली तहसील कार्यालय, शुक्रवार पेठ
पर्वती – स्पोर्टस आर्ट गॅलरी बिलिंडग, कै. बाबुराव सणस ग्राऊंड
हडपसर – शिंदे ज्युनिअर कॉलेज इमारत, साधना विद्यालय हडपसर
पुणे कॅन्टोन्मेंट – कार्यालय उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, जिल्हा परिषदे समोर कॅम्प
कसबापेठ – गणेश कला क्रीडा मंच, प्रदर्शन हॉल क्रमांक 1 स्वारगेट