पिंपरी – पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड मार्गावरील बसने बुधवारी (दि. 27) सकाळी अचानक पेट घेतला. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड जाणाऱ्या सीएनजी बस (एम. एच. 12 एच. बी. 1438) या दापोडी ते पिंपळे गुरव जोडणाऱ्या होडीचा पूल या पवना नदीवरील पुलावर अचानक पेट घेतला.
बसला अचानक लागलेल्या या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. चालकाची केबिन तसेच प्रवाशांच्या चाळीस टक्के आसन व पुढील बसचा संपूर्ण भाग आगीने कवेत घेतला. काही वेळातच बसचा पुढील भाग जळून खाक झाला. यावेळी बसचे चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरविण्यात यश मिळविले. यावेळी रस्त्याने जात असलेले सांगवी येथील रोहन दाभाडे प्रत्यक्षदर्शी यांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलास फोनद्वारे देत घटनेच्या गंभीर स्वरूप कळवले.
काही मिनिटांतच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच महिला कर्मचाऱ्यांनी बसच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या बसमध्ये सकाळची वेळ असल्याने अनेक चाकरमानी ज्येष्ठ, नागरिक तसेच शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी बसने प्रवास करत असल्याचे रोहन दाभाडे यांनी सांगितले. परंतु नागरिकांची सतर्कता व चालक व वाहकाच्या तत्परतेमुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले.