तळेगाव दाभाडे -तळेगाव नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून, भाजपचे गटनेते यांनी बोलावलेल्या बैठकीला भाजपचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि स्वतः भाजपचे गटनेतेच गैरहजर होते. यावर आमदार सुनील शेळके यांनी आढावा बैठकीत भाजपचे सत्ताधारी अंतर्गत कलहामुळे एकत्र येत नाहीत, असा हल्ला चढवत शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील विकास कामांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. “सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि बैठक बोलावणारे गटनेते अरुण भेगडे आणि त्यांचे सर्व सदस्य पुन्हा लपून बसले. हे का लपून बसलेत? हा प्रश्न आहे. नागरिकांच्या हिताकरिता आपण एकत्र येणे गरजेचे आहे.’, असे आमदार शेळके स्पष्ट केले.
या वेळी विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने नगरसेविका वैशाली दाभाडे, हेमलता खळदे, संगीता शेळके, मंगल भेगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, मुख्याधिकारी सतीश दिघे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, तालुका कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वैशाली भुजबळ व नगरपरिषदेतील सर्व अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भुयारी गटार आणि पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरात लवकर करावे. त्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची इमारत नव्याने उभी करायची आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्या कामांसाठी मान्यता द्यावी. नगरोत्थान, “डीपीडीसी’च्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत नगरपरिषदेने शहरातील महत्वाच्या कामांचे ठराव करून द्यावेत, ज्यामुळे नगरपरिषदेला 12 ते 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता येईल.
या वेळी आमदार शेळके यांनी नगरपरिषदेच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यामध्ये भुयारी गटार, पाणी योजना, तळेगाव-चाकण रस्ता रुंदीकरणात येणारे विजेचे खांब, रस्त्यावर बसणारे व्यावसायिक, नवीन नगरपरिषद इमारत, आंद्रा धरणातून तळेगावसाठी पाणी आणणे, तळेगाव स्टेशन भागात नवीन गॅसदाहिनी, डोळसनाथ महाराज सभामंडप व येत्या शुक्रवारी तळेगाव दाभाडे शहरात महालसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, याबाबत सखोल चर्चा यावेळी झाली.
शासनाकडून आतापर्यंत 35 कोटी 88 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. परंतु त्यामधील एकही काम सुरू केलेले नाही. सत्ताधारी भाजपला शहराच्या विकासाचे काही देणं-घेणं नाही. जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी कामे करा, असे आमदार शेळके यांनी यावेळी नमूद केले.
पत्रकार परिषद घेऊन भाजप नगरसेवकांची वकिली करण्यापेक्षा शहराच्या विकासासाठी हातात हात घालून काम करण्याच्या सूचना आपल्या सदस्यांना करा, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्षांना आमदार शेळके यांनी यावेळी लगावला.