नायपितॉ (म्यानमार), दि. 12 – म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तारुढ “नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ पक्षाला बहुमत मिळाले आहे. म्यानमारच्या राष्ट्रीय समन्वयक असलेल्या आंग सान स्यू की यांच्या “नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ अर्थात “एनएलडी’ची लढत “युनियन सॉलिडॅरेटी ऍन्ड डेव्हलपमेंट पार्टी’बरोबर होती. स्वतः आंग सान स्यू की यांनी यांगोनच्य कॉम्हू मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. या दोन पक्षांबरोबरच या निवडणूकीत युनियन बेटरमेंट पार्टी, युनायटेड नॅशनॅलिस्ट लीग फॉर डेमोक्रसी, फॅलोन सेसॉ डेमोक्रॅटिक पार्टी आणि एक अपक्ष ही निवडणूक लढवत होते.
एकूण 5,639 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. प्राथमिक मतमोजणीनुसार एनएलडीने जवळपास 400 जागांवर विजय मिळविला आहे. तर विरोधी युनियन सॉलिडॅरिटी ऍन्ड डेव्हलपमेंट पार्टी (युएसडीपी)ने केवळ 21 जागा जिंकल्या आहेत. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीमध्ये या पक्षाला 41 जागा मिळाल्या होत्या.
मतमोजणीवर अविश्वास दाखवत “युएसडीपी’ने फेरमतदानाची मागणी केली आहे. मात्र म्यानमारमधील निवडणूक आयोगाने ही मागणी धुडकावून लावली आहे. तत्पूर्वी म्यानमारचे लष्कर प्रमुख जनरल मिंग आँग लाइंग यांनीही निवडणूक यंत्रणा अपारदर्शक असल्याचा आरोप सरकारवर केला होता.
मात्र आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी आणि म्यानमारमध्ये दूतावास असलेल्या देशांनी सरकारने निवडणूका योग्य प्रकारे घेतल्या असल्याचे म्हटले आहे.