दखल : क्‍यूबात नवीन आव्हाने

-अभिमन्यू सरनाईक

क्‍यूबातील सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी कास्ट्रो कुटुंबातील सदस्य नसण्याची वेळ 1959 च्या क्रांतीनंतर प्रथमच आली आहे. फिडल कास्ट्रो यांचे बंधू राउल यांनी राजीनामा दिल्यावर मिगुएल दियाज-कानेल हे तेथील सर्वोच्च नेते बनले आहेत. नाजूक आर्थिक स्थितीबरोबरच इतर अनेक बाबतीत त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

राउल कास्ट्रो यांनी क्‍यूबातील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद सोडल्यानंतर तेथे एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. 1959 च्या क्रांतीनंतर क्‍यूबाच्या सर्वोच्च पदावर कास्ट्रो कुटुंबातील सदस्य नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. क्‍यूबामध्ये समानता आणि स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करणाऱ्या क्रांतीचे फिडेल आणि राउल कास्ट्रो हे नायक होत. क्रांतीनंतर देशाचे सर्वोच्च पद फिडेल कास्ट्रो यांनी सांभाळले होते आणि अमेरिकेसारख्या महाशक्‍तीशी चांगले संबंध नसताना समाजवादी व्यवस्था असलेल्या क्‍यूबाला पुढे नेले. फिडेल कास्ट्रो नसते तर जगाच्या नकाशावर ठिपक्‍याएवढ्या दिसणाऱ्या या देशात कुणाला फारसा रस असण्याचेही कारण नव्हते. 2006 मध्ये त्यांनी आपला भाऊ राउल याच्याकडे सर्वोच्च पद सोपविले आणि त्यानंतर पदत्याग केला.

क्‍यूबाच्या राज्यघटनेनुसार, कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस हेच राष्ट्रातील सर्वोच्च पद आहे. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने आता 61 वर्षीय राष्ट्रपती मिगुएल दियाज-कानेल यांना नवीन नेता म्हणून निवडले आहे. दियाज-कानेल 2018 मध्ये देशाचे राष्ट्रपती बनले होते. म्हणजेच, क्‍यूबाचे भवितव्य आता नवीन पिढीतील नेत्यांच्या हाती आहे. परंतु दियाज-कानेल यांच्यासमोर खूपच मोठी आव्हाने उभी आहेत. सोव्हिएत संघराज्याच्या पतनानंतर क्‍यूबा चीनवर अवलंबून होता. परंतु चीनमधून निर्यातीच्या स्वरूपात क्‍यूबाला मिळणारे उत्पन्न 40 टक्‍क्‍यांनी घटले आहे. पर्यटन हा तेथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे; परंतु करोना महामारीच्या प्रसारामुळे पर्यटन उद्योगही जवळजवळ ठप्प आहे.

क्‍यूबा आपल्याकडील कुशल डॉक्‍टरांना आणि सैनिकांना दुसऱ्या देशात पाठवत असे. त्यातूनही त्या देशाला चांगले उत्पन्न मिळत असे; परंतु ते उत्पन्नही समाप्त झाले आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी क्‍यूबावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. शिवाय जाता-जाता क्‍यूबा हा दहशतवादाचा मूलस्रोत असणारा देश आहे, असेही जाहीर केले आहे. या सर्व कारणांमुळे क्‍यूबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झाली आहे.
परंतु मेडिकल आणि बायोकेमिकल क्षेत्रात क्‍यूबाने खूपच प्रगती केली आहे.

करोनाच्या बचावासाठी लस तयार करण्यातही क्‍यूबातील शास्त्रज्ञ गुंतले आहेत. लस तयार झाल्यास त्यातूनही क्‍यूबाला उत्पन्नाचा एक स्रोत मिळू शकतो. क्‍यूबामध्ये तीन लसींवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. जुलै-ऑगस्टपर्यंत क्‍यूबाची लस बाजारात येईल, अशी क्‍यूबाला आशा आहे. असे झाल्यास क्‍यूबा आपल्या नागरिकांचे लसीकरण करू शकेल; शिवाय लसींची निर्यात करून महसूलसुद्धा वाढवू शकेल.

क्‍यूबातील नवीन पिढीत एक वर्ग असा आहे, ज्याला देशात सुरू झालेल्या उदारीकरणाच्या आणि खासगीकरणाच्या प्रक्रियेला वेग यावा असे वाटते. परंतु ज्यांनी 1959 पूर्वीचे दिवस पाहिले आहेत, अशा जुन्या पिढीतील लोक क्‍यूबामध्ये समाजवादी व्यवस्था कायम राहावी, या मताचे आहेत. कारण त्यांनी लोकांशी गुलामासारखा व्यवहार होताना पाहिले आहे. त्यामुळे उदारीकरणाची प्रक्रियाही हळूहळू पुढे न्यावी, अशा मताचे ते आहेत. त्यांच्या मते, क्‍यूबामध्ये वेगाने उदारीकरण आणि खासगीकरण आणण्याची भाषा जे करीत आहेत ते मियामीमध्ये बसलेले असे लोक आहेत, जे क्‍यूबाचा माजी हुकूमशहा बतिस्ताच्याबरोबर अमेरिकेत
निघून गेले होते.

क्‍यूबाला आता अमेरिकेशी संबंध सुधारायचे आहेत, कारण ओबामांच्या कार्यकाळात जेव्हा संबंध काहीसे सुधारले होते, त्याचा क्‍यूबाला मोठा फायदा झाला होता. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा क्‍यूबाविषयी काय दृष्टिकोन आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
क्‍यूबासोबत भारताचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. क्‍यूबातील लोक चांगले असतात असेच भारतातील सर्वसामान्य लोकांना वाटते. भारतीयांच्या बाबतीत हीच भावना क्‍यूबातील जनतेत आहे.

क्‍यूबा उदारीकरणाचे धोरण कोणत्या वेगाने राबवतो तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याकडील वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा वापर कसा करून घेतो, यावर दोन्ही देशांमधील संबंधांचे स्वरूप अवलंबून राहील. जर क्‍यूबाचा लसनिर्मितीचा कार्यक्रम यशस्वी झाला, तर भारत आणि क्‍यूबा दोन्ही देशांनी मिळून या क्षेत्रात काहीतरी करावे, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.