आंदोलनाबाबत पिंपरीत सत्ताधारी भाजपला घरचा आहेर

  • महापालिकेच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास

पिंपरी – अप्पूघरच्या मागील बाजूस असलेल्या सिद्धीविनायक नगरी येथे महापालिकेने जलनिःसारणाचे काम अर्धवट केले आहे. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हे काम लवकर पुर्ण न केल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा महापालिकेतील सत्ताधारी भाजपला त्यांचेच पदाधिकारी उमाशंकर सिंह यांनी दिला आहे.

दुर्गादेवी टेकडीवर आणि आसपासच्या परिसरात पडणारे पावसाचे पाणी जाण्यासाठी सिद्धीविनायक नगरी परिसरात काही वर्षापूर्वी एक नाली तयार करण्यात आली आहे. ही नाली ठिकठिकाणी फुटलेली असल्याने पावसाळ्यात वाहून येणारे पाणी रस्त्यावर येते. पावसासोबतच माती आणि वाळू देखील रस्त्यावर पसरते. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात याचा प्रत्येय नागरिकांना आला आहे. माती आणि वाळू रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहने घसरून पडतात.

येथील जलनिःसारणाचे काम करण्याबाबत उमाशंकर यांनी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र अवघ्या काही दिवसांत ठेकेदार काम अर्धवट सोडून गेला. पुढील पावसाळ्यात अप्पूघरच्या मागील बाजूस असलेल्या सिद्धीविनायक नगरीवासियांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. जर या ठिकाणचे काम लवकरात लवकर केले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उमाशंकर सिंह यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.