सत्ताधाऱ्यांना सरकार स्थापनेत रस नाही

कराड – महाराष्ट्राला स्थिर सरकार दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर अतिवृष्टीचे आज एक प्रचंड मोठे संकट आहे. याकडे कोणाचेच लक्ष नाही. यामुळे आम्ही आमच्यावतीने राज्यपालांना राज्याची सुत्रे हातात घ्या, असे निवेदन दिले आहे. सत्ताधारी सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यांना सरकार स्थापनेत जास्त रस नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

रेठरे खुर्द, ता. कराड येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेसमोर अतिवृष्टीचे मोठे संकट आहे. यामुळे राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. खरीप हंगातील पिके उध्दवस्त झाली असून रब्बी हंगामाची पेरणी झालेली नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

सत्ताधारी सरकारने तातडीने निर्णय घेऊन संबंधीत खात्याला निधी देऊन शेतकऱ्यांना मदत करावी. सेना-भाजपा जबाबदार राजकीय पक्ष आहेत. जनतेने त्यांना मते दिलेली आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे उत्तरदायीत्व स्विकारून काय तो निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्रात जर कोणीच सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर मग घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल.

आज संध्याकाळपर्यंत कोणीच दावा केला नाही तर मग राज्यपालांना घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल. भाजप कॉंग्रेसच्या आमदारांच्या संपर्कात आहे यावर ते म्हणाले, आमचे आमदार फुटणार नाहीत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.