पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील जप्त केलेल्या वाहनांच्या ई – लिलाव काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. यामुळे नियोजित तारीख 24 जून ऐवजी 1 जुलै 2021 रोजी आरटीओ कार्यालयातील 30 वाहनांचा लिलाव होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड आरटीओ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयातील कर थकीत असलेल्या तीस वाहनांचा लिलाव 24 जून रोजी होणार होता. मात्र तांत्रिक अडचण उद्भवल्याने तारखेमध्ये बदल करण्यात आला असून आता हा लिलाव एक जुलै रोजी होणार आहे.
याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यामुळे आता 24 जून या तारखेच्या गावासाठी ज्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. त्यांना नव्याने ऑनलाइन अर्ज पुन्हा सादर करणे गरजेचे आहे. मात्र, अशा अर्जदारांना कार्यालयात ऑफलाइन अर्ज सादर करण्याची गरज असणार नाही.
या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी 24 ते 28 जून दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करायची आहे. यानंतर कागदपत्र पडताळणी व अनामत रक्कम व वाहन निरीक्षणासाठी कार्यालयात 24 ते 29 जून दरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत करायचे आहे. तर, ई लिलाव 1 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी सहा दरम्यान होणार आहे. लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये बस, ट्रक, जेसीबी, टूरिस्ट टॅक्सी, पिकअप व्हॅन, गुड्स ट्रक आदी वाहनांचा समावेश आहे.