दिल्लीत 20 हजार कोटींचे हवाला रॅकेट उघड 

-तीन प्रकरणांमध्ये प्राप्तीकर विभागाकडून छापे आणि झडत्या 
-बोगस निर्यात, बनावट शेअर व्यवहारांद्वारे करचुकवेगिरी 

नवी दिल्ली – प्राप्तीकर विभागाने आज तब्बल 20 हजार कोटी रुपयांचे व्यवहार असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर “मनी लॉन्डरिंग’ होत असल्याचा प्राप्तीकर विभागाचा दावा आहे. या प्रकरणी प्राप्तीकर विभागाने जुनी दिल्ली परिसरामध्ये दिल्लीतील तपास पथकाच्या मदतीने गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. तर काही ठिकाणची झडतीही घेतली आहे.

प्राप्तीकर विभागाच्या या कारवाईमध्ये एकूण तीन गटांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नया बाझार परिसरामध्ये एका गटाची तपासणी केली असता त्यातून 18 हजार कोटी रुपयांची बनावट पावत्या उघडकीस आल्या. या गटाने बनावट पावत्यांवर डझनवारी खोटी नावे नोंदवली होती. त्यातूनच हे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणातील आरोपींची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.

अशाच दुसऱ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर “मनी लॉन्डरिंग’ करणारे रॅकेट उघड झाले. यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांच्या जुन्या शेअरची विक्री करून सध्याच्या व्यवहारांमध्ये फसवणूक करण्याची युक्‍ती बऱ्याच वर्षांपासून वापरली गेल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात लाभार्थ्यांकडून दीर्घकालीन भांडवली लाभाचा दावा केला जात असे. या प्रकरणात सुमारे 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असण्याचा कर विभागाचा संशय आहे.

“आतापर्यंत उघड झालेली माहिती म्हणजे हिमनगाचे टोक आहे. ही फसवणूक कित्येक वर्षांपासून सुरु असावी.’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्राप्तीकर विभागाने अशाच आणखी एका समूहाची तपासणी केली. त्यामध्ये विदेशी बॅंकांची बेहिशोबी खाती आणि निर्यातीच्या बोगस चलनाद्वारे जकात आणि जीएसटीचा परतावा परत मिळवणारे एक अख्खे रॅकेटच उघड झाले. या प्रकरणामध्ये 1,500 कोटी रुपयांची बोगस निर्यात असल्याचा प्राथमिक संशय आहे.

अशाच आणखी एका प्रकरणातील तपासादरम्यान स्वाक्षरी केलेले, विना स्वाक्षरीची कागदपत्रे, सामंजस्य करार, करार, रोख कर्ज आणि त्यावरील व्याज, आर्थिक वादातील तडजोडीची प्रकरणे, रोखीने तडजोड केल्याच्या पावत्या, वादग्रस्त स्थावर मालमत्तेबाबतच्या तडजोडीच्या पावत्यांसह सुमारे 100 कोटी रुपयांची अन्य कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणातील व्यक्‍तींसाठी विदेशातील सहली आणि त्यासाठी लागणारे विदेशी चलनही या तपासादरम्यान आढळून आले आहे. या प्रकरणांमध्ये एकूण 20 हजार कोटी रुपयांची करचुकवेगिरी झाली असल्याचा अंदाज आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.