मुळशीकरांना हवे आणखी दोन टीएमसी पाणी

खासदार सुळेंनी घेतली दखल ः उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांना दिले पत्र

पिरंगुट (पुणे) -जिल्ह्यातील मुळशी तालुक्‍यात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. तालुक्‍यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुळशी धरणातून तालुक्‍यासाठी मिळणारे 1.2 टीएमसी पाणी सध्या पुरत नाही. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी 2 टीएमसी इतके जादा पाणी मिळावे, याची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली आहे. तसे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी दिले आहे.

यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष व मुळशीचे माजी सभापती रवींद्र कंधारे आणि बारामती लोकसभा समन्वयक प्रवीण शिंदे उपस्थित होते. या मागणीसाठी रवींद्र कंधारे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शासकीय करारानुसार तालुक्‍यातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी 1.2 टीएमसी पाणी दिले जाते. वास्तविक गेल्या काही वर्षांत अनेक नवीन मोठे गृहप्रकल्प झाले आहेत. तसेच मोठे औद्योगिक प्रकल्प, हिंजवडी येथील राजीव गांधी आय.टी. पार्क, शैक्षणिक संस्था वाढत आहेत. शिवाय तालुक्‍यातून पुणे शहर – चांदणी चौक, पौड – ताम्हिणी – माणगाव हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. भविष्यात आणखी दोन रिंग रोडही जाणार आहेत. याचा विचार करता तालुक्‍याची लोकसंख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता मुळशी तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

  • म्हणून वाढीव पाण्याची गरज
    कोळवण खोऱ्यातील तीन बंधाऱ्यामधील पाणी सध्या या भागासाठी नियोजित आहे. परंतु तो पाणीसाठा पुरेसे नाही. या भागातील तीनशे एकर शेतीकरिता मुळा नदीवरून पाणी उपसा जलसिंचन योजना करण्यात येणार आहे. त्यासाठीही वाढीव पाण्याची गरज आहे. तसेच माले, पौड, कोळवण आणि रिहे खोरे व मुळशी तालुक्‍यातील इतर गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठीची पाण्याची वाढीव पाण्याची गरज आहे. याचा विचार करून मुळशी तालुक्‍यातील नागरिक व शेतकऱ्यांना 2 टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.