दोन्ही राजांच्या भूमिकांमुळे भाजपमध्ये वाढली अस्वस्थता 

श्रीकांत कात्रे
सातारा  -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात साताऱ्यातील दोन राजे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्षात आहेत. तुल्यबळ, ताकदवान नेते आपल्या पक्षात आहेत, तरीही भाजपला त्याचा आनंद मिळत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे भाजपमधील अस्वस्थता वाढत चालली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी असणाऱ्या मित्रत्त्वात सातत्याने भर पडत आहे. त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी वाढत असलेली सलगी भाजपला खटकणारी असली तरीही काही बोलता येत नाही, अशी भाजपची अवस्था झाली आहे. उदयनराजे भोसले यांच्यामुळे पक्षाला मोठी ताकद मिळेल, केवळ साताराच नव्हे तर राज्यात त्यांचा फायदा मिळेल, असा भाजपचा कयास फोल ठरला आहे.

मुळात उदयनराजे नेहमीच पक्षापेक्षा लोकांना आणि व्यक्तिगत संपर्काला महत्त्व देतात. त्यामुळे भाजपला अपेक्षित असे काहीच घडत नसल्यामुळे दोन्ही राजांच्या भूमिकेमुळे भाजप हतबल होत चालला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व स्थापनेपासून कायम आहे. त्याउलट भाजपची स्वतःची ताकद नाही. पक्षातील मूळ कार्यकर्त्यांपेक्षा पक्षामध्ये आलेली ताकदवान नेतेमंडळी हीच पक्षाची ताकद राहिली आहे.

सातारा शहर व तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदवान होती. त्याचे कारण त्यावेळी दोन्ही राजे त्या पक्षात होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा जिंकली. त्यानंतर काही महिन्यांतच खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे आता सातारा शहर व तालुक्‍यावर भाजपची पकड आहे, असे कागदावर म्हणता येईल. प्रत्यक्षात तसे होत नसल्यामुळे भाजपपुढच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने त्या अडचणीत भर पडली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपला आलेला फुगवटा पुढे टिकला नाही. भाजप सत्तेत असताना तत्कालिन मंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क होता.

अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यात भाजपची पुन्हा सत्ता येईल, या अंदाजामुळे काही नेते- कार्यकर्ते पक्षाकडे वळविण्यात त्यांना यश आले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप मजबूत बनणार, असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात भाजपला सत्ता न मिळाल्यामुळे हे चित्र सध्यातरी विस्कळित झाले आहे.

त्यातच उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे पक्षात आल्याने भाजपची मरगळ दूर झाली होती. राज्यात वेगळे सरकार आल्याने भाजपप्रमाणेच या दोन्ही नेत्यांचीही अडचण झाली. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी अजित पवार यांच्याशी वेळोवेळी संपर्कात राहत काही कामे करून घेतली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत.

भाजपकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ते उपस्थिती लावतात. तो दिलासा भाजपमध्ये असला तरी राजकारणात काहीही होऊ शकते, या समीकरणानुसार थोडी धाकधूक भाजपच्या गोटात आहे. उदयनराजे पक्षापेक्षाही जनतेला महत्त्व देत असल्याने भाजपलाही ते लागू असल्याचे चित्र आहे.

 

स्थानिक राजकारणालाच प्राधान्य
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले दोघेही भाजपमध्ये असले आणि त्यांनी राज्याच्या राजकारणात भाजपसाठी काम करावे, अशी भाजपची अटकळ असली तरीही स्थानिक पातळीवरील राजकारणातच दोगे अधिक लक्ष घालतात. सातारा पालिकेच्या राजकारणातही दोघांच्या आघाड्या रंग भरत आहेत. त्यात पालिकेची हद्दवाढ झाल्यामुळे नव्याने येणाऱ्या भागातील राजकारणासाठी डावपेच सुरू झाले आहेत. शहर व परिसरीाल विकास कामांसाठी दोन्ही राजे आग्रही असतात. कास तलावाची उंची, मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न अशा स्थानिक मुद्‌द्‌यांचा पाठपुरावा दोन्ही राजांकडून सुरू असतो. त्यामुळे भाजपने कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या गोटातील अस्वस्थता संपेल, याची चिन्हे दिसत नाहीत. प्रदेशाध्यक्ष चेंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष दिले तरच भाजपमध्ये येऊ लागलेली मरगळ दूर होण्यास मदत होईल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.