लसीकरणानंतरच्या ‘साईड इफेक्ट्स’वर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मांडली भूमिका

नवी दिल्ली – देशात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणास 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. लसीकरणाची ही जगातील सर्वात मोठी मोहीम असून पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यकर्मी अर्थात हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंट लाईनवर काम करणाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाईल. मात्र लस घेतलेल्या काहींना ‘साईड इफेक्ट’ जाणवल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने भूमिका मांडली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘देशात आतापर्यंत 4,54,049 जणांना करोना लस देण्यात आली आहे.लस घेतलेल्यांपैकी 0.18% लोकांना ‘साईड इफेक्ट’ जाणवले तर 0.002% जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. लसीकरण मोहीम सुरु होऊन तीन दिवस उलटल्यानंतर ‘साईड इफेक्ट’ जाणवणाऱ्यांची संख्या नगण्य असून हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे.”

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सात महिन्यांनंतर देशातील सक्रिय बाधितांचा आकडा प्रथमच 2 लाखांपर्यंत खाली आला आहे. तसेच आठ महिन्यांनंतर करोनामुळे दिवसभरात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण प्रथमच  140 इतके कमी झाले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सध्या 50 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.