नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अर्थात एलएसीवर संवेदनशील परिस्थिती आहे असे विधान दोनच दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले होते. त्यानंतर याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी खुलासा केला आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबतच्या लष्कराच्या आणि मंत्रालयाच्या भूमिकेत कोणताही विरोधाभास नाही असे मंत्रालयाने म्हटले आहे. लष्करप्रमुख असेही म्हणाले होते की या भागात भारतीय आणि चिनी सैन्यात काही प्रमाणात गतिरोध आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, आम्हाला लष्करप्रमुखांनी जे सांगितले आहे आणि आम्ही घेतलेल्या भूमिकेत कोणताही विरोधाभास दिसत नाही. गेल्या वर्षी 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या करारानंतर, भारतीय आणि चिनी बाजूंनी सैन्य मागे घेण्यात आले. डेमचोक आणि डेपसांग या दोन उर्वरित वादग्रस्त ठिकाणी सैनिक होते.
या आठवड्यात एका पत्रकार परिषदेत जनरल द्विवेदी म्हणाले होते की भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात गतिरोध आहे आणि परिस्थिती शांत करण्यासाठी आणि विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र काम करावे लागेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की डेपसांग आणि डेमचोकमधील घर्षण बिंदूंवर सैन्य माघारी पूर्ण झाली आहे.
लष्करप्रमुखांच्या टिप्पण्यांबद्दल विचारले असता, जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, या मुद्द्यावर लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय दोघांचीही भूमिका समान आहे. जयस्वाल म्हणाले, परराष्ट्रमंत्र्यांच्या संसेदत मांडण्यात आलेल्या भूमिकेचा मी उल्लेख करू इच्छितो. सैन्य मागे घेण्याबाबत परराष्ट्रमंत्र्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, 21ऑक्टोबर रोजी झालेल्या कराराच्या बाबतीत, आमचे उद्दिष्ट पूर्वीप्रमाणेच संबंधित गस्त बिंदूंवर गस्त घालणे सुनिश्चित करणे आहे.