दृष्टिहिन विद्यार्थ्यांच्या इशाऱ्यावर चालला रोबोट

“फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅंपियनशिप’मध्ये यश
विजेत्यांना जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्वची संधी
 
पुणे – जन्मल्यापासूनच दृष्टि नसल्याने समोर येणाऱ्या अनेक अडचणींशी दोन हात करणाऱ्या अंध मुलांनी केवळ चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर रोबोटची निर्मिती करीत “फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅंपियनशिप’ या रोबोट निर्मिती स्पर्धेत उतरायचे ठरविले. केवळ ठरविलेच नाही तर “बीएसआरसी निवांत’ हा रोबोट बनवीत स्पर्धेच्या पाहिल्याच दिवशी उपस्थितांची मनेही जिंकली.

इन्फिनिटी एक्‍स टेक सिस्टिम्सच्या वतीने बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे “फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चॅंपियनशिप’चे आयोजन करण्यात आले आहे. सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. इन्फिनिटी एक्‍सचे संस्थापक व प्रमुख कार्यकारी संचालक अश्‍विन सावंत, विश्‍वकर्मा विद्यापीठाचे मुख्य परीक्षा अधिकारी युवराज लाहोटी, फिऍट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बावेजा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्‍ट्रॉनिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. शाळीग्राम, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाचे सहसंचालक जयप्रकाश दुबळे आणि जर्मनीच्या पर्यावरण तज्ज्ञ कॅरलाईन अलार्ड आदी यावेळी उपस्थित होते. या रोबोट निर्मिती स्पर्धेत संपूर्ण देशामधून सातवी ते बारावी अर्थात 12 ते 18 वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांचे 47 संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी “बीएसआरसी निवांत’ या अंध विद्यार्थ्यांच्या संघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अरुण गर्ग आणि सुमेश जैस्वाल या दोघांनी या संघाला मार्गदर्शन केले. या वर्षी “स्कायस्टोन’ ही स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून “स्टार वॉर्स’ चित्रपटाप्रमाणे अंतराळातील काल्पनिक शहराच्या निर्मितीचे आव्हान यंदाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे हे नववे वर्ष असून या स्पर्धेतील 2 विजेत्या संघांना अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.