मुंगी घाटात घुमला “हर हर महादेव’चा गजर

मानाच्या कावडीतून शिवलिंगाला जलाभिषेक : लाखो भाविकांची उपस्थिती

गोंदवले – रणरणत्या उन्हात अवजड कावडी घेवून शिवभक्तांनी शिखर शिंगणापूरचा अवघड मुंगी घाट सर केला. या मानाच्या कावडीतील जलाने शिवलिंगाला जलाभिषेक घालून शिखर शिंगणापूर यात्रेची उत्साहात सांगता झाली. मुंगी घाट सर करताना उपस्थित हजारो भाविकांनी म्हाद्या धाव, म्हाद्या पाव, हर हर महादेवच्या जय घोष करत अवघा डोंगर दणाणून सोडला.

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येतील महादेवाच्या कावड यात्रेला शिव मंदीरात गुढी उभारुन सुरुवात झाली होती. हळदीच्या कार्यक्रम पार पडल्या नंतर ध्वज बांधण्यात आले. त्यानंतर इंदौरचे काळगौडा राजे यांनी काल शिव पार्वतीचे दर्शन घेतले. त्यानंतर अवघड अशा मुंगी घाटातुन कावडी वर चढण्यास सुरुवात झाली. त्यानुसार आज कावडी मुंगी घाटातून वर येवू लागल्या.

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी खळद, एकतपूर, शिवरी, बेलसर, सासवड, मावळ पंचक्रोशीमधून कावडी येतात. खळद येथील निवृत्ती महाराज खळदकर, सासवडची काशीनाथ कावडे, संत तेली भुतोजी बुवा या मानाच्या कावडी कोथळे भागात आज दुपारी पोहचल्या. कावडींपुढे भाविकांकडून फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. कावडींना ठिकठिकाणी ओवळण्यात आले. तांब्याचे दोन हंडे, त्यावर उंच असा झेंडा त्याला विविध रंगाचे कपडे लावून सजवण्यात आले.
अनेक लहान लहान कावडीनी चढाई सुरू केली होती.

मोठ्या उत्साहात पहिला टप्पा कावडींनी चढल्यावर सर्वत्र आनंद साजरा केला जात होता. दुसरा टप्पा भर उन्हातही सरसर चढला जात होता. दोन्ही टप्पे थोडे कमी उंचीचे असल्याने लवकर सर झाले. उंच डोंगर असूनही भाविक कावडी घेवून कड्या कपारीतून महादेवाचा धावा करत वर येत होते. शिवभक्तांच्या अंगातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. मात्र हे सगळे विसरून देवाच्या भेटीसाठी सर्वजण आसुसलेले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संत तेली भुतोजी बुवा यांची कावड मुख्य मार्गावर दाखल झाली. कावडीने अवघड असा मुंगी घाटाचा प्रवास सुरु करताच हर हर महादेवचा गजर सुरू झाला.

भर दुपारी डोंगरातुन लाखो भाविक थरार पाहण्यासाठी जागा मिळेत तिथे बसून होते. सायंकाळी उशिरापर्यंत अनेक कावडी वर आल्या. दरम्यान, मानाची संत तेली भुतोजी बुवा यांची कावड दुसऱ्या टप्यावर आली होती. रात्री उशिरा सर्व कावडी उत्साहात मुंगी घाट सर करुन वर आल्या. कावड मिरवणुकीपुढे ढोल-ताशे, सनई हालगी या वाद्यांचा गजर कडकडात सुरू होता. कावड खांद्यावर घेवून नाचवली जात होती. सर्व तल्लीन होऊन नाचत होते. यानंतर कावडी महादेवाच्या मंदीरात दाखल होवून निरा नदीसहसह पंचनद्यांच्या जलाने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला. कावडी मुंगी घाटातून वर आल्यावर राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत कावडीधारकांचे स्वागत करण्यात आले. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे, सपोनि प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. स्वागतासाठी विभागीय आधिकारी दादासाहेब कांबळे, अनिल वडनेरे, शिंगणापूर सरपंच अभय मेंनकुदळे, उपसरपंच शंकर तांबवे, दीपकराव तंडेबडवे, आनंद बडवे, धनंजय कवडे, पोलिसपाटील संतोष बोराटे, वीरभद्र कावडे, जाधव आण्णा, चारूदत्त तोडकर, आदींनी शिंगणापूर डोंगर माथ्यावर मानांच्या कावडींचे स्वागत केले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.