पत्राशेडवर मेहेरबानी कशासाठी? अतिक्रमण विभागाची फक्त नावालाच कारवाई
चऱ्होली – भोसरी परिसरातील चांदणी चौक ते पीएमटी चौकपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या हातगाडी व्यावसायिकावरती “इ’ क्षेत्रीय व “क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. मात्र सरसकट धडक कारवाई न करता बोटावर मोजण्या इतपत हातगाड्यावर कारवाई करून अतिक्रमण विभागाने काय हेतू साध्य केला, असा प्रश्न आता भोसरीकर उघडपणे बोलत आहेत.
भोसरी उड्डाणपुलाच्या खाली व सेवारस्ता तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील पदपथावर, भोसरी रुग्णालयासमोरील पदपथ व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पदपथ गिळंकृत केला आहे. शिवाय पत्र्याचे पक्के शेड उभारून मालकीची जागा असल्याचा अविर्भाव व्यावसायिकामध्ये आहे.
अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकामध्ये बहुतेक व्यावसायिक हे परराज्यातील आहेत. भोसरी परिसरात वास्तव्य करून त्यांनी चायनीज सेंटर, फळांचे दुकाने, कपड्यांचे दुकाने सर्रास थाटली आहेत. त्यामुळे भोसरीतील नागरिकांना रोजचाच मनस्ताप होऊन बसला आहे.
रस्त्यावरील असलेली वाहनांची गर्दी व या गर्दीमधून वाट काढताना रस्त्यावरील पदपथ गायब असल्यामुळे अडचणीचे ठरत आहे. अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकाकडे हॉकर्स झोनचे प्रमाणपत्र नाही, याशिवाय पालिकेने ठरवून दिलेल्या हॉकर्स झोनचा ही झोल झाला असल्याचे नोंदणीकृत व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
धडक कारवाई झालीच नाही
भोसरीतील “इ’ क्षेत्रीय कार्यालयातील माजी क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीतील अतिक्रमणवर तीन-चार वर्षांपूर्वी सर्वात मोठी धडक कारवाई करण्यात आली होती. कुठल्याही राजकीय संबंधांना न जुमानता केलेल्या कारवाईत अतिक्रमणचा सुपडा साफ केला होता.
त्यांच्या या कारवाईने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र आता परत रस्त्यांचा श्वास कोंडला जात असून, तेव्हापासून अशी धडक कारवाई करण्याचे धाडस आतापर्यंत कुणाला जमले नाही. हा संशोधनाचा विषय आहे. तर अशा कारवायांना कोण प्रतिबंध घालू पाहतात हे सुद्धा भोसरीकरांसाठी एक गूढ बनून आहे.