एका रात्रीत तयार झाला रस्ता

भोसरी-दिघी सीमेवरचा रस्ता रात्रभरात विकसित
पंचवीस वर्षे प्रलंबित प्रश्‍न सुटला : सावंतनगरमधील नागरिकांना दिलासा

भोसरी – स्थानिक जागा मालकांच्या विरोधामुळे 25 वर्षांपासून रस्त्याचे काम रखडते…, कच्च्या स्वरुपाच्या रस्त्यामुळे धूळ, खड्ड्यांनी नागरिक त्रस्त होतात…, पावसाळ्यात त्यावरुन चालताही येत नाही…, यावर अचानकपणे सायंकाळी बैठक होते…, जागा मालकांचे मन वळविण्यास यश येते…, ऑन द स्पॉट ना हरकत दाखला मिळतो…, महापालिकेची यंत्रणा कामाला लागते आणि एका रात्रीत रस्ता तयार होतो… अतिशयोक्ती वाटावा असा अनुभव भोसरी-दिघी रस्त्यावरील सावंतनगरवासियांनी प्रत्यक्षात घेतला.

याबाबतची हकीकत अशी की, गेल्या पंचवीस वर्षांपासून भोसरी-दिघी रस्त्याचे काम रखडले होते. महापालिकेने सर्व प्रक्रिया पुर्ण करुन रस्त्याच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध केली होती. मात्र, सावंतनगरमधील जमीन मालकांच्या विरोधामुळे हा रस्ता प्रलंबित होता. महापालिकेने अडीच वर्षापूर्वी या रस्त्यावर मुरूम देखील टाकला होता. परंतु, विरोधामुळे पुढील काम झाले नाही. खड्डा आणि धुळीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले होते. वाहने घसरुन
अपघात होत होते.

पावसाळ्यात रस्त्यावरुन पायी चालणे देखील मुश्‍किल झाले होते. शहरात चकाचक रस्ते, उड्डाणपूल असताना सावंतनगरमधील हा कच्चा रस्ता पाहून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, यावर तोडगा काढण्यासाठी काल (मंगळवार) सायंकाळी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासन व जागा मालकांची समन्वय बैठक घेतली. स्थानिकांना विश्‍वासात घेण्यात त्यांना यश आले. याच ठिकाणी जागा मालकांनी ना हरकत पत्रे दिली. पत्र मिळताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागली. रात्री अकरा वाजता रस्त्याचे काम सुरू केले अन्‌ एका रात्रीत रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले. सकाळी दहा वाजेपर्यंत रस्त्याचे काम पुर्ण झाले होते. सकाळी उठल्यावर हा रस्ता पाहून स्थानिक रहिवाशांना सुखद धक्का बसला. काहींचा तर हाच “तो’ रस्ता असल्यावर विश्‍वास बसला नाही. यंदाचा पावसाळा सुखकर होणार असल्याची प्रतिक्रिया दिघीकरांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड म्हणाले की, दिघी परिसरात सध्या सुमारे 80 ते 90 हजार लोकसंख्या आहे. या भागातील नागरिकांना भोसरी आणि संबंधित परिसरात ये-जा करण्यासाठी सावंतनगर येथील रस्ता अत्यंत सोईचा ठरणार आहे. भोसरी परिसरातील अंतर्गत रस्ते विकसित करण्याची भूमिका आमदार महेश लांडगे यांनी घेतली. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुमारे 84 लाख रुपये खर्च करून हा रस्ता सुसज्ज करण्यात येणार आहे. सध्या सुमारे 9 मीटर रुंदीचा हा रस्ता विकसित केला आहे.

नगरसेवक सागर गवळी म्हणाले की, भूसंपादनाच्या मोबदल्यात महापालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या परताव्याबाबत बधित गवळी आणि काटे कुटुंबियांमध्ये नाराजी होती. मात्र, आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने सर्वांना सोबत घेवून तोडगा काढला आहे. त्यामुळे गवळी आणि काटे कुटुंबियांच्या सकारात्मक पुढाकार घेतला आणि रस्त्याच्या कामाला चालना मिळाली. रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्‍न यामुळे मार्गी लागला आहे.

दिघी भोसरीचा शिव रस्ता, सावंतनगर कमान ते पंचशील बुद्धविहार हा रस्ता मागील 25 वर्षांपासून रखडला होता. दिघीकर आणि भोसरीकर यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय होता. रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मॅगझीन कॉर्नर ते भोसरी असा पाच किलोमीटरचा वळसा घालून भोसरीला जावे लागत होते. रस्त्याबाबत अनेकांनी आश्‍वासने दिली. परंतु, प्रश्‍न काही मार्गी लागला नव्हता. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून एका रात्रीत रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. रात्री अकरा वाजता काम सुरु झाले. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत रस्ता पूर्ण झाला. हा दिघीकरांसाठी आनंदाचा क्षण आहे.

– विकास डोळस, नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.