“बांधकाम’च्या टेबलवर अडकला पोलिसांचा रस्ता

प्रशांत जाधव

खासदार निधी मिळूनही टेंडर प्रक्रियेला विलंब; पोलीस कुटुंबीय आंदोलनाच्या पावित्र्यात

बांधकाम मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

“प्रभात’ने गुरूवारी “पोलिसांच्या नशिबी तुटक्‍या इमारती अन्‌ खड्ड्यांचा रस्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पोलीस वसाहत रस्त्याच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत. या वृत्ताची गंभीर दखल घेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तात्काळ कामाला सुरूवात करण्याचे आदेश दिल्याचे श्री. पाटील यांनी “प्रभात”ला सांगितले.

सातारा – जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या गोडोली येथील पोलीस वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. आठवड्यातून दोन तरी अपघात होत आहेत. मात्र, बांधकाम विभागाला काहीच पडले नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या फंडातून निधी आल्यानंतरही बांधकाम विभागाला टेंडर प्रक्रिया वेळेत करता न आल्यानेच या रस्त्याचे काम रखडल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर “प्रभात”ला दिली. त्यामुळे बांधकाम विभागाच्या टेबलवर अडकलेला पोलिसांचा रस्ता पुढे कधी सरकणार, असा सवाल विचारला जात आहे.

तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक माधव सानप यांच्या पाठपुराव्यानंतर 1992 मध्ये जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना 30 इमारतीत दोनशे चाळीस खोल्या असलेली पोलीस वसाहत बांधली गेली. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात बाकीच्या सुविधा पुरवण्यात आल्या मात्र, त्यानंतर या वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज त्याठिकाणी राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. जिल्हाभर बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांना
ड्युटीचा ताण कमी असतो म्हणून की काय बाधंकाम विभाग आलेल्या पैशाचे नियोजन न करता त्यांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा आरोप केला जात आहे.

एकीकडे राज्यात कुठेही खड्डा दिसणार नाही असे राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सांगत असताना दुसरीकडे मंत्र्याच्याच घोषणेला बांधकाम विभाग कसा खो घालत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे साताऱ्यातील पोलीस वसाहतीचा रस्ता. रस्त्यात खड्डे असणे एकवेळ समजून घेण्यासारखे आहे. मात्र, खड्ड्यांचाच रस्ता असणे म्हणजे त्या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या जिवाशी खेळ करण्यासारखे आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मतदार नाहीत म्हणून दुर्लक्ष?
पोलीस वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे मतदान हे जिल्ह्यात तर काही जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यातच पोलीस वसाहतीच्या इमारती असणारा परिसर त्रिशंकूभागात आहे. त्यामुळे येथे राहणारे बहुतेक लोक सातारा लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील मतदार नसल्याने व त्रिशंकू भाग असल्यानेच या परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.

लवकरच कामाला सुरूवात करू

पोलीस वसाहतीच्या रस्ता दुरूस्तीचे काम काही कारणांमुळे रखडले होते. मात्र, आम्ही त्यावर मात करून लवकरच त्या रस्त्याच्या कामाला सुरूवात करू.

– लक्ष्मण वाघमोडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)