हिंदमाता रेल्वे पुलाचा मार्ग बंद

पावसाचे पाणी साचले : निचरा करण्याची मागणी

तळेगाव-दाभाडे – रविवार (दि.30 जून) रोजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या हिंदमाता रेल्वे भुयारी पुलामध्ये पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणावर साचत असल्याने पुलाचा मार्ग बंद झाला आहे. या पुलामध्ये साचणाऱ्या पाण्याचा त्वरित निचरा करण्याची मागणी नागरिकांनी केली.

तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच तळेगाव दाभाडे- चाकण राष्ट्रीय मार्ग ते नगरपरिषद जवळचा मार्ग करण्यासाठी 10 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीतून हिंदमाता रेल्वे भुयारी पूल उभारण्यात आला आहे. त्या पुलाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मावळ सुरू असलेल्या संततधार पावसाने या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पूल करून त्याचा वाहतुकीसाठी उपयोग करता येत नसल्याने नागरिकांच्या आशावर पाणी फिरले आहे. उद्‌घाटनप्रसंगी या पुलातील साचलेले पाणी काढण्यासाठी इंजिन वापरले होते. उद्‌घाटन झाल्यानंतर इंजिन बंद केल्याने पाणी साचत आहे. कोटींच्या निधीतून उभारलेला भुयारी मार्ग नावालाच आहे.

पाण्यात कार बुडल्याने क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आली. या भुयारी पुलाच्या खाली स्विमिंग पूल झाल्याचे दिसत होते. या पुलामध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक अरुण माने, सोमा भेगडे, आशिष खांडगे, मिलिंद अच्युत, सुहास गरुड आदी नागरिकांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.