प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 1 -सिंहगड रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या फनटाईम ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत कालव्याच्या बाजुने तयार केलेल्या रस्त्यावर वाहतूक सुरू करण्यास अडचण ठरणारे खांब अखेर महापालिका आणि महावितरणने हटविले आहेत. उर्वरीत कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करून हा रस्ता दहा-बारा दिवसांत सुरू केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, दीड वर्षांपासून रस्त्यात अडथळा ठरणारे महावितरणचे चार खांब काढलेले नव्हते. याबाबत दै. प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते.
एक सिग्नल वाढणार
हा रस्ता सुरू झाल्यानंतर पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ आणखी एक पंक्चर केले जाणार आहे. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. हे पंक्चर दत्तवाडी सिग्नल आणि नवशा मारुती सिग्नलच्या मध्यभागीच येत असल्याने या अंतरात एक सिग्नल वाढणार आहे. त्यामुळे पालिकेकडून काय उपाययोजना करता येईल, हे पाहिले जात आहे.
काय होती अडचण
तीन वर्षांनंतर अनेक अडथळे पूर्ण करत हे काम पूर्ण झाले होते. मात्र, रस्त्यावर चार ठिकाणी मध्यभागीच विजेचे खांब होते. ते हटवल्याशिवाय रस्ता सुरू करणे शक्य नसल्याचे समोर आले होते. हे खांब आधीच काढले गेले असते, तर हा रस्ता आतापर्यंत वापरात आला असता. तसेच उड्डाणपुलाच्या कामामुळे होणाऱ्या कोंडीतून वाहनचालकांना दिलासा मिळाला असता.
या रस्त्यात अडथळा ठरणारे खांब हटविण्यात आले आहेत. त्यामुळे खांब काढलेल्या जागेचे लवकरच कॉंक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यानंतर पुढील आठ ते दहा दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
– व्ही.जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख
दुचाकींसाठी महत्वाचा रस्ता
हा रस्ता दुचाकींसाठी महत्वाचा आहे. धायरीकडे तसेच वडगाव, तुकाईनगर, माणिकबाग, आनंदनगर, हिंगणे भागात जाण्यासाठी या रस्त्याने थेट सिग्नलविना जाता येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना नवशा मारुती, राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे चौक, संतोष हॉल, माणिकबाग तसेच गोयल गंगा चौकामध्ये कोंडीत जाणारा वेळ कमी होणार आहे.