बीजिंग : करोना विषाणूचा धोका महिला आणि पुरुषांना सारखाच असतो. मात्र पुरुषांना जाणवणारा धोका महिलांच्या तुलनेत अधिक गंभीर असतो, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. प्रौढ पुरुष रुग्णांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असे या अभ्यासाद्वारे सुचवण्यात आले आहे.
प्रौढांमध्येही ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे, अशांना कोविड-19 चा संसर्ग झाल्यास त्यांच्या मृत्यूची शक्यता अधिक वाढलेली असते, असे आतापर्यंतच्या अभ्यासाद्वारे म्हटले जात असे. मात्र “फ्रंटलायनर्स इन पब्लिक हेल्थ’ या नियतकालिकात करोनाचा धोका पुरुष-स्त्रियांना कमीअधिक प्रमाणात असतो, असा दावा चीनमधील टोंग्रेन हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञ जिन कोई यांग यांनी केला आहे.
चीनमधील मृत्यू होणाऱ्यांची माहिती तपासल्यावर महिलांपेक्षा पुरुष रुग्णांची मृत्यू पावण्याची संख्या अधिक असल्याचे आढळले. लिंगपरत्वे ही तफावत का असावी, याचा अभ्यास केला गेल्यावर शास्त्रज्ञांकडे तर्कसंगत स्पष्टिकरण नसल्याचे लक्षात आले. त्यानुसार करोना विषाणूचा परिणाम महिलांपेक्षा प्रौढ पुरुषांवर अधिक होत असावा.
त्यामुळे त्या पुरुष रुग्णांची अतिरिक्त काळजी आवश्यक असल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी उपचार केलेल्या 43 आणि डाटा सार्वजनिक असलेल्या 1,056 रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण संशोधकांनी केले. करोनाचा विषाणू आणि 2003 मध्ये आलेल्या सार्स विषाणूमध्ये साधर्म्य असल्याने डॉक्टरांनी सार्स विषाणूचे गुणधर्मही तपासून बघितले.
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 70 टक्के पुरुष होते. म्हणजे पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण महिलांपेक्षा 2.5 पट अधिक असल्याचे आढळले. पुरुषांमध्ये “एसीई2′ हे प्रोटिन अधिक असते. त्यावरच या विषाणूचा हल्ला होत असल्याने पुरुषांना करोनाचा अधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकतो आहे.